माझा जन्म ज्या सिंध प्रांतात झाला तो आज भारतात नाही याचे मला अजूनही वाईट वाटते अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. मी कोणत्याही देशाचे थेट नाव घेणार नाही. पण आशियातील बरेच देश असे आहेत की ज्यांच्यासोबत भारताचे संबंध सुधारल्यास मला आनंदच होईल असेही ते म्हणालेत.
India Foundation इंडिया फाऊंडेशन अवेरनेस या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आदी मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अडवाणींनी त्यांच्या ‘मन की बात’ सांगितली. अडवाणी म्हणाले, तुमच्यापैकी किती लोकांना याची जाणीव आहे हे मला माहित नाही. पण स्वातंत्र्यापूर्वी सिंध हा भाग भारतात होता. या भागात माझा जन्म झाला. पण स्वातंत्र्यांनंतर भारताच्या हातून गेला आणि आज तो भाग पाकिस्तानमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH At an event in Delhi Lal Krishna Advani says "The fact that Sindh is not part of India today makes me sad." pic.twitter.com/dJRSBWy9yi
— ANI (@ANI) April 10, 2017
कार्यक्रमात सहभागी झालेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तिस्ता नदी कराराचा मुद्दा उपस्थित केला. १९७१च्या बांगलादेशमुक्ती लढ्यात भारतीय जनता आणि सरकारने आम्हाला मोलाची साथ दिली अशी आठवण करुन देत हसीना म्हणाल्या, तिस्ता नदी करारावर आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले आहे. नदी वाटप करार हा दोन्ही देशांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारत आणि बांगलादेशने सीमा रेषेचा वादही सामंजस्याने निकाली काढला असेही त्यांनी आवर्जून सांगितले. बांगलादेशची शांतता दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे धोक्यात आली असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा झाली. या दोघांमध्ये तिस्ता नदी करार आणि पश्चिम बंगालमधील समस्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.