लष्कराकडून जम्मू-काश्मीरमधील राजकारण्यांना आणि मंत्र्यांना देण्यात आलेले पैसे ही लाच नसून, समाजात सदभावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ते दिले गेल्याचा खुलासा माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 
स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून जम्मू-काश्मीरमधील काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याची खळबळजनक माहिती सिंग यांनी दिली होती. त्यानंतर कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षांकडून सिंग यांच्यावर टीका करण्यात आली. कोणत्या मंत्र्यांना लष्कराने पैसे दिले, त्यांची नावे जाहीर करावीत, केंद्र सरकार त्यांची चौकशी करेल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सिंग यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. राजकारण्यांना वैयक्तिक किंवा राजकीय वापरासाठी पैसे देण्यात आलेले नाहीत. ती लाच निश्चितच नाही. जर कोणी मंत्र्यांना लाच देण्यात आल्याचे म्हणत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.
काश्मीरमध्ये स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी पैसे देण्यात आले. फुटीरतावाद्यांना सामील होण्यापासून लोकांना रोखण्यासाठी, त्यांच्यामध्ये सदभावना निर्माण करण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.