Uttarakhand journalist Death Case : उत्तराखंडमधील पत्रकार राजीव प्रताप यांच्या मृत्यूची गेल्या काही दिवासांपासून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. यादरम्यान प्रताप यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटीने म्हटले आहे की, १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या कारचा अपघात होण्यापूर्वी ते दारूच्या नशेत होते आणि आपघातानंतर ते नदीत कोसळले.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे (IIMC) माजी विद्यार्थी असलेले राजीव प्रताप ( ३६) दिल्ली उत्तराखंड लाईव्ह (Delhi Uttarakhand Live) नावाचे एक यूट्यूब चॅनल चालवत होते. १९ सप्टेंबर रोजी प्रताप हे उत्तरकाशी येथून बेपत्ता झाल्याची नोंदवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह २८ सप्टेंबर रोजी जोशियारा बंधाऱ्यात आढळून आला होता.
मात्र प्रताप यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय आरोप केला होता. यावेळी त्यांनी उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयाचे रिपोर्टिंग आणि त्यासंबंधी प्रश्न उपस्थित केल्यावरून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या असेही नमूद केले आहे. मात्र पोलिसांनी त्यांचा मृत्यू हा कार अपघातामुळे झाल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी एसआयटीने दावा केला की प्रताप हे मद्यपान करत होते आणि ज्या दिवशी ते बेपत्ता झाले त्या दिवशी त्यांची गाडी दरीत कोसळली.
१८ सप्टेंबरच्या रात्री काय झालं?
उपअधीक्षक जनक पनवार यांच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, प्रताप हे उत्तरकाशी पोलीस लाइनमधील हेड कॉन्स्टेबल सोबन सिंह यांच्याबरोबर दारू पीत होते. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रताप, सिंह आणि प्रताप यांचा कॅमेरामन मानवीर कालुदा हे पोलीस लाइन्सच्या मागे शहीद स्मारक जवळ भेटले. त्यानंतर ते टॅक्सी स्टँडकडे परत आले, जेथे त्यांनी मद्यपान सुरू केले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास कालुदा घरी गेला तर प्रताप आणि सिंह हे गाडी चालवत मार्केटकडे गेले आणि त्यानंतर बस स्टँड जवळच्या एका हॉटेलात गेले.
“रात्री ११ च्या सुमारास प्रताप हे हॉटेलातून बाहेर पडताना दिसत आहेत, ते दारूच्या नशेत असल्यासारखे दिसून आले. त्यानंतर थोड्याच वेळाने सोबन सिंह देखील बाहेर जाताना दिसून आले. दोघेही वाहनात बसले, पण सिंह लगेचच खाली उतरले,” असे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजनुसार रात्री ११.२२ वाजता सिंह प्रताप यांच्याशी बोलताना दिसून आले, जे कारमध्ये बसलेले होते. त्यानंतर कार बाद्री तिराहा, तेखला ब्रिज आणि अखेरची गांगोरी ब्रिजवर रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. त्यानंतर ती कॅमेऱ्यात कैद झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
चौकशीदरम्यान सोबन सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, प्रताप अस्थिर असल्याने त्यांनी त्याला गाडी चालवू नये असा सल्ला दिला होता, तरीही प्रताप तेथून निघून गेला. सिंह पुढे म्हणाले की, ते त्याच दिशेने काही अंतर चालत गेले, पण त्यांना गाडी दिसली नाही, म्हणून ते त्यांच्या घराकडे परतले.
दुसऱ्या दि कार आढळून आली
दुसऱ्या दिवशी कार सापडल्यानंतर सिंह यांनी ती प्रताप यांची कार असल्याची ओळख पटवली. तसेच पोलिसांनी सांगितले की सिंह यांची एक बॅग गंगोरी ब्रिजच्या पुढे ६०० मिटर अंतरावर, जिथून कार दरीत कोसळली असा अंदाज व्यक्त होत आहे त्या ठिकाणाच्या जवळ रस्त्याच्या कडेला आढळून आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या रात्री मानेरी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वाहन खालच्या बाजूला वाहत गेले असू शकते.
कारची तांत्रिक पाहाणी केली असता, कारचे चारही दरवाजे लॉक असल्याचे आणि खिडकीच्या कासा वर असल्याचे आढळून आले, तसेच कारचे इग्निशन ऑन होते आणि चावी कारच्या आतच होती. पोलिसांनी सांगितले की छेडछाड झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत आणि कारचे लॉक लागलेले होते आणि काचा कार कोसळल्यानंतर फुटल्या होत्या.
शवविच्छेदन अहवालात काय आढळले?
पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालातून असे उघड झाले आहे की, प्रताप यांचा मृत्यू छाती आणि पोटावर झालेल्या अंतर्गत जखमांमुळे झालेल्या रक्तस्त्राव आणि धक्क्यामुळे झाला. बाहेरील वस्तूमुळे किंवा मारहाणीमुळे झालेल्या कोणत्याही जखमा अहवालात आढळून आल्या नाहीत. अंतर्गत जखमा या स्टिअरिंग व्हीलच्या धक्क्याशी जुळणाऱ्या आहेत, ज्या सामान्यपणे वाहन खाली पडल्यावर होतात, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी असेही सांगितले की, रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी अखेरचे पाहिले गेल्यानंतर, गांगोरी भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन पीकअप्स आणि एक टेम्पो ट्रॅव्हलर ५ ते १० मिनिटांत तेथून गेल्याचे दिसून आले. “त्या चालकांची कसून चौकशी केली गेली आणि त्यांच्या वाहनांचीही तपासणी केली केली, पण कोणतीही उपयोगी माहिती मिळाली नाही. इलेक्ट्रॉनिक आणि इतर पुरवे गोळा करण्याचे काम सुरू आहे,” असे एसआयटीने म्हटले आहे.
कुटुंबियांचे आरोप
प्रताप यांच्या कुटुंबीयांनी मात्र पोलीस प्रकरण बंद करण्याची घाई करत असल्याचा आरोप केला आहे. “त्यांना एका विशेष तपासाची जबाबदारी देण्यात आली होती, पण त्यांनी खूपच लवकर निष्कर्ष काढले. आम्ही त्यांच्या डोळ्यांना आणि डोक्याला जखमा कशा झाल्या हे विचारत आहोत, पण आम्हाला कोणतीही उत्तरे मिळाली नाहीत. कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDRs) आम्हाला देण्यात आलेले नाहीत. तसेच त्याच पोलीस ठाण्यामधील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. जर तेच अधिकारी असतील तर मग एसआयटीला काय अर्थ राहतो?” असा प्रश्न या प्रकरणातील तक्रारदार असलेले प्रताप यांचे काका, कृपाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.