विजय सिंग्ला आणि रेल्वे मंडळाचे सदस्य महेश कुमार यांच्या लाचबाजीप्रकरणी माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनीसुमारे सहा तास मंगळवारी चौकशी केली.
रेल्वेतील लाचखोरीप्रकरणी बन्सल यांची नेमकी कोणती भूमिका होती, याचा तपास घ्यायचा असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महेश कुमार यांच्यासमवेत झालेल्या बैठका, रेल्वे मंडळाच्या सदस्यपदी त्यांची झालेली बढती आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा त्यांच्याकडे सोपविण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार आदी मुद्दय़ांसंबंधी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून बन्सल यांची कसून चौकशी करण्यात आली. दूरध्वनींवरील संभाषण, दूरध्वनी संभाषणाचा तपशील तसेच सिंग्ला याने महेश कुमार यांना त्यांच्या बढतीसंबंधी दिलेला निर्वाळा आदी मुद्दय़ांवरून सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा बन्सल यांच्याशी वादविवादही झाला, असे सांगण्यात आले.
महेश कुमार आणि बन्सल यांच्या बैठकीसंबंधी सीबीआयने जमा केलेल्या पुराव्यासंबंधी बन्सल आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. या संपूर्ण प्रकरणी आपण निर्दोष असून सिंग्ला आणि महेश कुमार यांच्यात काही व्यवहार झाल्याची आपल्याला काहीही माहिती असल्याचेही बन्सल यांनी
नाकारले.