पीटीआय, राजौरी/जम्मू
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी १४ तासांत दुसरा हल्ला केला. रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी झालेल्या या दोन हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन बालकांचा समावेश आहे.

दहशतवाद्यांनी राजौरीतील डांगरी गावात रविवारी सायंकाळी तीन घरांवर गोळीबार केला होता. त्यात चार नागरिकांचा मृत्यू, तर सहाजण जखमी झाले होते. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या प्रितम लाल यांच्या घराजवळच सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. त्यात सान्वी शर्मा (७) आणि विहानकुमार शर्मा (४) या बहिण-भावाचा त्यात मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. अवघ्या १४ तासांतच झालेल्या दोन हल्ल्यांनी जम्मू-काश्मीर हादरले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ राजौरी शहरासह जिल्हाभरात संतप्त निदर्शने झाली.

राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरू आहे. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. हे अद्ययावत स्फोटक (आयईडी) एका पिशवीखाली दडवण्यात आले होते. या परिसरात कसून तपास करण्यात येत असून, संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तिथे आणखी एक स्फोटक येथे सापडले. लष्कर आणि पोलीस मोठय़ा प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत, असे सिंग यांनी सांगितले.

रविवारच्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांनी तीन घरांवर गोळीबार केला होता. त्यात चार ठार आणि सहा जण जखमी झाले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सिंग यांनी सांगितले.या दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना शोधून कठोर शिक्षा करण्यात येईल, असे जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले. हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आणि वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी’
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी असल्याची प्रतिक्रिया डांगरीचे सरपंच दीपक कुमार यांनी व्यक्त केली. या हल्ल्यांमुळे अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना येथे सुरक्षित वाटत नाही. प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.