मुंबईच्या वाटय़ाला प्रतीक्षा; उत्तर प्रदेश, बिहार व बंगालमधील एकही शहर नाही
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मागे टाकून पुणे आणि सोलापूर या शहरांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या यादीत स्थान पटकावले आहे. शहरांना आधुनिक बनवून त्यांचा चेहरा-मोहरा बदलू पाहाणाऱ्या या योजनेतील २० शहरांची यादी केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर केली. त्यात नवी दिल्ली, भुवनेश्वर, गुवाहाटी, अहमदाबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी ९७ शहरांची निवड करणार आहे. त्यासाठी सुमारे ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व बिहारमधील एकही शहर नाही, तर भाजपशासित मध्य प्रदेशातील सर्वाधिक म्हणजे तीन शहरांनी या यादीत स्थान पटकावले आहे.
केंद्र सरकारच्या यादीत भुवनेश्वरने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. तर सोलापूर नवव्या क्रमांकावर आहे. या शहरांना पहिल्या दोन वर्षांत दोनशे कोटी तर पुढील तीन वर्षांत शंभर कोटी रुपये विकास कामांसाठी दिले जाणार आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ९७ शहरांना ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी निवडले होते. त्यातील पहिली यादी आज प्रसिद्ध झाली. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत गुरुवारी जाहीर झालेली यादी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील दोन वर्षांत ४०-४० अशी एकूण ८० शहरांची नावे प्रसिद्ध होतील. त्यात महाराष्ट्रातील उर्वरित आठ शहरांची निवड करण्यात येईल.
योजनेचे कल्पनाबीज मांडणाऱ्या मसुद्यात विस्तारीकरणाऐवजी शहरांना आधुनिक करण्यावर सरकारने भर दिला आहे. २०२२ पर्यंत निवडक शहरांना ‘स्मार्ट’ करण्यात येईल. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के जनता शहरांमध्ये राहते. परंतु सकल राष्ट्रीय उत्पन्नात या शहरांचा वाटा सुमारे साठ टक्के आहे. सरकारी दाव्यानुसार या योजनेमुळे येत्या दहा वर्षांत हा वाटा सुमारे ७५ टक्क्य़ांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शहर विकासात राज्यांचाही सहभाग राहील.
– संबंधित महाप्रदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्ट सिटीत राजकारण?
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व बिहारमधील एकही शहर पहिल्या यादीत नसल्याने भाजप व विरोधी पक्षात शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. बिहारच्या पराभवामुळे तेथील एकही शहर घेण्यात आले नसल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने तेथील नावे निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
पहिल्या यादीतील शहरे
भुवनेश्वर, पुणे, जयपूर, सुरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम, सोलापूर, दावणगिरी, काकिनाडा, नवी दिल्ली, इंदूर, कोईम्बतूर, बेळगाव, उदयपूर, गुवाहाटी, लुधियाना, चेन्नई, भोपाळ.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart city project in pune and solapur
First published on: 29-01-2016 at 01:27 IST