गेल्या काही दिवसांपासून मणिपूर हिंसाचारावरून संसदेत घमासान सुरु आहे. केंद्र सरकारकडून चर्चेची तयारी दाखवली जात आहे. तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी ( २६ जुलै ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. मणिपूर पेटवण्यासाठी राहुल गांधी जबाबदार असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
प्रश्नोत्तराच्या तासात पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदार अमी याग्निक यांनी स्मृती इराणी आणि अन्य महिला मंत्री मणिपूर हिंसेवर कधी बोलणार? असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नानंतर स्मृती इराणी संतापल्याच्या पाहायला मिळाल्या.
स्मृती इराणी म्हणाल्या की, “राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमधील घटनांवर बोलण्याची हिंमत तुमच्यात कधी येणार? लाल डायरीबद्दल बोलण्यास तुमच्यात हिंमत आहे का? काँग्रेस शासित राज्यांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाविरोधात बोलण्याची हिंमत आहे का?”
राहुल गांधी यांचा उल्लेख करत स्मृती इराणी यांनी म्हटलं की, “राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये जात पेटवण्याचं काम केलं, यावर तुम्ही कधी बोलणार आहात?”