देशातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. दररोज नवीन रुग्ण आढळून येत असून, बिहारमध्ये प्रचारात व्यस्त असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर संपर्कात आलेल्या लोकांनी करोना टेस्ट करून घेण्याचं आवाहनही इराणी यांनी केलं आहे.

गेल्या आठवड्यात स्मृती इराणी बिहारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त होत्या. दहापेक्षा अधिक प्रचारसभांना त्यांनी संबोधित केलं होतं. दरम्यान, आज त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. “असं कधी कधीच होत की, जेव्हा काही सांगायचं असेल तर मला शब्द शोधावे लागतात. त्यामुळे साधारण हे साधारणच ठेवते. मला करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. जे लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांना विनंती आहे, स्वतःची करोना चाचणी आवश्य करून घ्यावी,” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

ऐन करोना संकट काळातच बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहे. निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतानाच स्मृती इराणी यांचा करोनाची लागण झाल्याचं निदान झालं. स्मृती इराणी यांनी मंगळवारीच गोपालगंज येथील प्रचार सभेला संबोधित केलं होतं. त्याचबरोबर तीन चार दिवसांपूर्वी बरौली, मुंगेर आणि बिक्रम विधानसभा मतदार संघातील प्रचार सभांनाही त्या उपस्थित होत्या.