snake rescuer drape Cobra around his neck : दीपक महावर या व्यक्तीने मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यात आजवर अनेक सापांना जीवदान दिलं. पण सोमवारी एका इंडियन कोब्राला वाचवताना एक चूक केली, जी त्यांना चांगलीच महागात पडली. सापाला वाचवल्यानंतर बाईकवरून जाताना तो साप स्वत:च्या गळ्यात गुंडाळून ठेवला. अखेर या व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला. कोब्रा सापाने त्यांना चावा घेतला, यानंतर उपचार मिळून देखील महावर यांचा काही तासातच मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जेपी कॉलेजमध्ये पार्ट-टाईम कामगार असलेल्या ३५ वर्षीय महावर यांनी स्वतःच सापांना हाताळण्याची कला शिकून घेतली होती. आणि ही मृत्यू होण्याच्या काही काळ आधी त्यांनी कोब्रा साप स्वत:च्या गळ्याभोवती गुंडाळून एक व्हिडीओ देखील काढला होता.
प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालयातील कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक रेस्क्यूसाठी कॉल आल्यानंतर महावर बरबटपुरा गावात गेले होते. त्यांनी कोब्राला पकडले आणि एका काचेच्या कंटेनरमध्ये ठेवले. नेहमीप्रमाणे सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मुलाच्या शाळेतून फोन आला. त्याच्या १३ वर्षांच्या मुलाची शाळेतून लवकर सुट्टी झाली होती.
घाईत महावर यांनी सापाला काचेच्या डब्यातून बाहेर काढले आणि स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळून घेतले. घाई घाईत शाळेकडे जात असताना साप तिथे व्यवस्थित राहिल असे वाटल्याने त्यांनी त्याला गळ्याभोवती गुंडाळले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक मान सिंह ठाकूर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की , “आपल्या मुलाला शाळेतून लवकर सोडण्यात आल्याचे ऐकताच सर्प मित्राने साप आपल्या गळ्यात अडकवला आणि तो दुचाकीवरून प्रवास करत होता. त्या सापाने त्याला हातावर चावा घेतला.”
सापाने चावा घेतल्यानंतरही महावर हे बराच वेळ शुद्धीत होते त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून मदत मागितली. त्यांना सुरूवातीला राघोगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर गुणा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बरे होत असल्याचे वाटल्याने त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला, पण मध्यरात्री त्यांची स्थिती खालवली. “त्यांना अत्यंत नाजूक स्थितीत रुग्णालयात परत आणण्यात आले, पण पुढील उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला,” असे ठाकूर यांनी सांगितले.
महावर यांच्या मागे त्यांची दोन मुले आहेत, ज्यांचे वय १४ वर्ष आणि १२ वर्षे असे आहे. या मुलांच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे.