Sneha Debnath : मागील सहा दिवसांपासून दिल्लीतून बेपत्ता झालेल्या दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या १९ वर्षीय मुलीचा मृतदेह यमुना नदीत आढळून आला आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. स्नेहा देबनाथ ही मूळची त्रिपुरा येथील रहिवासी होती. दिल्ली विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. दरम्यान तिचा मृतदेह मिळाला असून तिच्या कुटुंबाने तिच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
१९ वर्षीय स्नेहा ७ जुलैपासून बेपत्ता
१९ वर्षीय स्नेहा देबनाथ ७ जुलैपासून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबानेच याबाबतची माहिती माध्यमांना आणि पोलिसांना दिली होती. तिचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं. दरम्यान या मुलीचा मृतदेह आता पोलिसांना आढळून आला आहे. दरम्यान पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली आहे. त्यामुळे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की हे आत्महत्येचं प्रकरण आहे. ती तिच्या अभ्यासामुळे काही निराश झालेली नव्हती. तिने आयुष्य संपवण्याचा हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकलेलं नाही. तिच्या नैराश्याचं कारण तिचं कुटुंब असू शकतं अशीही शक्यता पोलिसांना वाटते आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
सिग्नेचर पूल हे शेवटचं लोकेशन
सिग्नेचर पूल या ठिकाणी तिचं शेवटचं लोकेशन दाखवत होतं. हा भाग असा आहे जिथे सीसीटीव्हीमध्ये कायम बिघाड झालेला असतो. या भागात तिला एका कॅब चालकाने का सोडलं होतं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्नेहाचा मृतदेह यमुना नदीत आढळून आला आहे. गीता कॉलनी भागातील उड्डाण पूलाजावळ हा मृतदेह आढळून आला आहे. हे ठिकाण सिग्नेचर पूल या ठिकाणापासून १० किमी अंतरावर आहे.
नेमकी काय घडली घटना?
स्नेहा देबनाथ या विद्यार्थिनीचा तिच्या कुटुंबाशी ७ जुलैला संपर्क झाला होता. त्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार ती सराय रोहिल्ला या रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालली होती. तिने ७ जुलैच्या सकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी आईला फोन करुन ही माहिती दिली होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिचं कुटुंब चिंतेत आहे. दरम्यान या प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका कॅब चालकाने हे सांगितलं आहे की सिग्नेचर पूल या भागात त्याने स्नेहाला सोडलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा भाग असा आहे की तिथले सीसीटीव्ही कायमच खराब झालेले असतात. खराब सीसीटीव्ही फुटेज असलेल्या भागात स्नेहा का गेली? सीसीटीव्ही फुटेज का खराब होतं असे अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणाच्या भोवती फिरत होते. त्यामुळे स्नेहाच्या शोधकार्यात पोलिसांना अडचणीही येत आहेत असंही पोलिसांनी सांगितलं होतं. दरम्यान आता तिचा मृतदेहच पोलिसांना सापडला आहे.
स्नेहाच्या आईची अपेक्षा नेमकी काय होती?
७ जुलैच्या सकाळी स्नेहाचा मला फोन आला. आमचं बोलणं झालं. त्यानंतर मी सकाळी पावणेनऊच्या सुमाारास तिला पुन्हा फोन केला. तेव्हा तिचा फोन स्विच ऑफ लागला. त्यानंतर आम्ही तिच्या मित्राकडे, मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यावेळी आम्हाला समजलं की स्नेहाला कुणीही त्या सकाळी भेटलं नव्हतं. फक्त एक कॅब चालकच होता ज्याने स्नेहाला सिग्नेचर पूलाजवळ सोडलं होतं. त्या ठिकाणचा एकही सीसीटीव्ही चालत नाही तरीही स्नेहा त्या ठिकाणी उतरली. त्यामुळे आता स्नेहा तिथून नेमकी कुठे गेली? हा आमच्यापुढेही मोठा प्रश्न आहे. तिला लवकरात लवकर शोधण्यात यावं असंही तिच्या आईने म्हटलं होतं. आजच ही प्रतिक्रिया समोर आली होती. आता रात्री तिचा मृतदेह मिळाल्याची बातमीच समोर आली आहे.