अमेरिकेच्या हेरगिरीचा पर्दाफास करून जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने आश्रय मिळावा यासाठी बुधवारी रशियाला साकडे घातले आहे. मात्र सध्या मॉस्को विमानतळावर आश्रय घेतलेल्या स्नोडेन याने अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केले असून या गुन्ह्य़ासाठी त्याने अमेरिकेत येवून चौकशीला सामोरे जायला हवे आणि रशियानेदेखील त्याला अमेरिकेच्या ताब्यात द्यावे, असे व्हाइट हाउसने बुधवारी स्पष्ट केले.
स्नोडेन याने अमेरिकेच्या गुप्त कार्यक्रमाची माहिती उघड करून गंभीर गुन्हा केला आहे.अमेरिकेच्या इतर नागरिकांप्रमाणे त्यालाही कायदेशीर चौकशीला सामोरे जाणे बंधनकारक आहे.  त्यामुळे त्याने आपल्या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अमेरिकेत परत येणे आवश्यक असल्याचे व्हाइट हाउसचे प्रसारमाध्यम सचिव जे कार्नी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्नोडेनला पून्हा अमेरिकेत आणण्यासाठी रशियाशी बोलणी सुरू आहेत. स्नोडेन याने अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे आणि त्यासाठी त्याला पून्हा अमेरिकेत आणून कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे हा आमचा उद्देश असल्याचे जे कार्नी यांनी म्हटले आहे.