मुंबई: गुजरात दंगलप्रकरणी तेथील तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांना शनिवारी गुजरात पोलिसांनी मुंबईतील घरातून ताब्यात घेतले. गुजरात दंगलप्रकरणी खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली सेटलवाड यांच्याविरोधात गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सेटलवाड यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात दंगलीप्रकरणी खोटी माहिती प्रसारीत करणे, कट रचणे आदी विविध आरोपांखाली सेटलवाड यांच्याविरोधात डीसीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी दर्शनसिंह बराड यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासह माजी पोलीस अधिकारी संजीव भट्ट व आर.बी. श्रीकुमार यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खोटय़ा माहितीच्या आधारावर आरोपींनी झकिया जाफरी यांच्या मार्फत अनेक याचिका केल्या. तसेच विशेष तपास पथकाला आणि याप्रकरणी नेमण्यात आलेल्या इतर आयोगांना खोटी माहिती देण्यात आली. या तीन आरोपींनी हा कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 याप्रकरणी गुजरात एटीएसचे पथक शनिवारी दुपारी सेटलवाड यांच्या जुहू तारा रोड येथील निवासस्थानी दाखल झाले.  यावेळी सांताक्रुझ पोलिसांची त्यांनी मदत घेतली. गुजरात पोलिसांनी सेटलवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना स्थानिक पोलीस ठाणे सांताक्रुझ येथे नेण्यात आले. अहमदाबाद पोलीस आयुक्तालयातील डीसीबी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने आलो असून त्याप्रकरणी सेटलवाड यांना सोबत घेऊन जात असल्याचे गुजरात पोलिसांनी सांताक्रुझ पोलिसांना सांगितले. त्याबाबत तेथे कागदोपत्री कारवाई केल्यानंतर पुढील चौकशीसाठी गुजरातला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान यावेळी मारहाण झाल्याचा अर्ज सेटलवाड यांनी सांताक्रुझ पोलिसांकडे केला. पोलीस या अर्जावर प्रक्रिया करत असल्याचे उपायुक्त संजीव लाटकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने २००२ च्या गुजरात दंगलीबाबत पंतप्रधान मोदींना विशेष तपास पथकाने बहाल केलेल्या निर्दोषत्वाविरोधात झकिया जाफरी यांची याचिका शुक्रवारी फेटाळली होती. नुकतीच एटीएसच्या या कारवाईपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सेटलवाड यांनी २००२ च्या गुजरात दंगलीबाबत पोलिसांना निराधार माहिती दिल्याचा आरोप केला होता.

सेटलवाड यांचा पोलिसांवर मारहाणीचा आरोप

सेटलवाड यांनी घरात असतानाच वकिलाशी बोलू देण्याची मागणी केली. त्यावेळी गुजरात पोलीस दलातील महिला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप सेटलवाड यांनी केला आहे. गुजरात पोलिसांचे पथक सेटलवाड यांना त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यांना गुजरातमधील अहमदाबादला नेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुजरात पोलीस सेटलवाड यांना वाहनात बसवत असताना त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social activist arrested ats action ahmedabad riots ysh
First published on: 26-06-2022 at 00:02 IST