X Down in India : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) जगभरात डाऊन झालं आहे. त्यामुळे लाखो युझर्संना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक युजर्संना नॉट वर्किंगचा मेसेज येत आहे, तर काहींना एक्स ऑपरेट करताना अडचणी येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) आज जगभरातील वापरकर्त्यांसाठी डाऊन झालं असून भारतासह अमेरिकेतील लाखो युझर्संना देखील अडचणी येत आहेत.

एक्स (ट्विटर) डाऊन होण्याचं कोणतंही अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या हवाल्याने जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे. फक्त एक्स हेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झालं असून क्लाउडफ्लेअरच्या सेवाही जगभरात डाऊन आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे जगातील अनेक डिजीटल सेवांवर याचा परिमाण झाला आहे. क्लाउडफ्लेअरची सेवाही डाऊन झाल्यामुळे जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, डाउनडिटेक्टरच्या मते, अमेरिकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) डाऊन झाल्याबाबत आतापर्यंत ११,५०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. एक्स युझर्संनी हे अॅप योग्यरित्या अॅक्सेस करू शकत नसल्याची आणि त्यावरील कंटेंट पाहू शकत नसल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, असं मानलं जात आहेत की, सर्व्हरमधील तांत्रिक समस्यांमुळे अनेक प्रमुख प्लॅटफॉर्म एकाच वेळी क्रॅश झाल्यांचा अंदाज आहे.

क्लाउडफ्लेअर म्हणजे काय?

क्लाउडफ्लेअरचं नाव अनेकांना माहीत असेल. क्लाउडफ्लेअरला इंटरनेटचा कणा म्हटलं जातं. कारण ते केवळ वेबसाइट्सचं संरक्षण करत नाही तर वेबसाइट्सना स्थानिक कंटेंट नेटवर्क प्रदान करतं. क्लाउडफ्लेअर एक अमेरिकन कंपनी आहे, जी वेबसाइट्सची सुरक्षितता आणि वेग वाढवण्यासाठी सेवा पुरवते. जेव्हा त्यांच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड होतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त एका वेबसाइटपुरता मर्यादित नसतो, तर एकाच वेळी हजारो प्लॅटफॉर्मवर होतो, म्हणूनच अलिकडच्या डाउनटाइममुळे सोशल मीडियापासून ते स्ट्रीमिंग सेवांपर्यंत लाखो वापरकर्त्यांना समस्या येत आहेत.