श्रीनगर : काश्मिरी पंडित असलेले शेतकरी पूरण कृष्ण भट यांच्या गेल्या आठवडय़ात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांसह काही नागरिकांच्या गटाने सोमवारी येथील ‘हुरियत कॉन्फरन्स’च्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

येथील राजबाग येथील ‘हुरियत’चे नेते मीरवाईझ उमर फारूक यांच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील रक्तपातासाठी त्यांनी ‘हुरियत’ला जबाबदार धरले. आंदोलकांनी ‘हुरियत’च्या मध्यवर्ती इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी भारताच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या. या कार्यालयावरील फुटीरतावाद्यांच्या या संघटनेचा फलक त्यांनी हटवला. या कार्यलयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप होते. आंदोलकांत सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि काश्मिरी पंडित सहभागी झाले होते. आंदोलकांपैकी एकाने सांगितले, की ‘हुरियत’चे कार्यालय लवकरच बंद केले जाईल आणि या वास्तूत एक अनाथाश्रम चालवला जाईल. आणखी एक काश्मिरी पंडित आंदोलकाने सांगितले, की काश्मीरवासीयांना रक्तपात नव्हे तर शांतता हवी आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील चौधरी गुंड भागातील वडिलोपार्जित घराबाहेर पूरण कृष्ण भट यांची शनिवारी दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. ते त्यांच्या फळबागांची देखभाल करण्यासाठी गेले होते. भट यांच्या पार्थिवावर रविवारी जम्मूत अंत्यसंस्कार करण्यात आले.