तब्बल ३८ वर्षांनंतर सियाचीनमध्ये सापडला शहीद झालेल्या ‘त्या’ जवानाचा मृतदेह; १९८४ मध्ये पाकविरुद्धच्या मोहिमेत झालेला बेपत्ता

वडीलांचे छत्र हरपले तेव्हा त्यांच्या मुली सात आणि चार वर्षांच्या होत्या. आज या मुली ४५ आणि ४२ वर्षांच्या आहेत.

तब्बल ३८ वर्षांनंतर सियाचीनमध्ये सापडला शहीद झालेल्या ‘त्या’ जवानाचा मृतदेह; १९८४ मध्ये पाकविरुद्धच्या मोहिमेत झालेला बेपत्ता
३४ वर्षांनंतर बर्फाखाली सापडला मृतदेह

१९८४ साली भारत आणि पाकिस्तानदरम्यान सियाचीन येथे झालेल्या युद्धामध्ये १९ कुमाऊं रेजीमेंटचे लान्सनायक चंद्रशेखर र्बोला शहीद झाले होते. संघर्षादरम्यान बर्फाच्या वादळात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. या वादळामध्ये एकूण १९ जवान शहीद झाले होते. यापैकी १४ जवानांचे मृतदेह बर्फाच्या ढीगाऱ्याखालून काढण्यात लष्काराला यस आलं होतं. मात्र पाच जणांचे मृतदेह सापडले नव्हते. पण या अपघाताच्या ३८ वर्षानंतर यापैकी शहीद चंद्रशेखर यांचं पार्थिव सापडलं आहे. लवकरच चंद्रशेखर यांचं पार्थिव उत्तराखडंमधील त्यांच्या हल्द्वानी येथील मूळ गावी पाठवलं जाणार आहे. जेव्हा चंद्रशेखर शहीद झाले तेव्हा ते अवघ्या २७ वर्षांचे होते. वडीलांचे छत्र हरपले तेव्हा त्यांच्या मुली सात आणि चार वर्षांच्या होत्या. आज या मुली ४५ आणि ४२ वर्षांच्या आहेत.

दुर्घटनेच्या ३८ वर्षानंतर सियाचीनमधील बर्फामध्ये चंद्रशेखर यांचं पार्थिव मिळालं आहे. याची माहिती भारतीय लष्कराने चंद्रशेखर यांच्या कुटुंबियांना दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर ल्ष्कराच्या प्रोटोकॉल्सप्रमाणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असंही सांगण्यात आलं आहे. या मृतदेहाजवळ सापडलेल्या लष्कराच्या बिल्ल्यावरील क्रमांकावरुन मृतदेहाची ओळख पटली.

शहीद चंद्रशेखर यांची पत्नी शांति देवी या हलद्वानी येथे सरस्वती विहार कॉलीनेमध्ये वास्तव्यास आहेत. ३८ वर्षांपूर्वी पती चंद्रशेखर यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर शांति देवी यांनी मृतदेह सापडलेला नसतानाही रीति रिवाजानुसार अंतिम संस्कार केले होते. चंद्रशेखर यांचं पार्थिव न सापडल्याने त्यांच्या पत्नीला आणि मुलींना अंत्यदर्शनही घेता आलं नव्हतं. मात्र आता ३८ वर्षानंतर चंद्रशेखर यांच्या पत्नीबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलींना वडिलांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.

१९८४ मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान सियाचीनवरुन वाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ऑप्रेशन मेघदूत अंतर्गत १९ कुमाऊं रेजीमेंटच्या जवांनी एक तुकडी पाठवण्यात आली होती. मात्र बर्फाच्या वादळामध्ये अडकल्याने या तुकडीमधील १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये चंद्रशेखर यांचाही समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soldier remains found in siachen after 38 years scsg

Next Story
स्वा. सावरकर फलक वाद: शिवमोगातील हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी