“भारतातील काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. एखाद्या विशिष्ट धर्माचा अपमान करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होत नाही,” असे मत देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. सुधारित नागरिकत्व काद्याबद्दल बोलताना नायडू यांनी हे मत व्यक्त केलं आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त नायडू चेन्नईमधील श्री रामकृष्ठ मठद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.

रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये नायडू यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबद्दल आपली मते मांडली. “काही लोकांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे असं वाटतं. हे योग्य नाही. मात्र त्यांना त्यांचा दृष्टीकोन ठेवण्याचा अधिकार आहे. एखाद्या धर्माचा तिरस्कार करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असं समजता कामा नये. धर्मनिरपेक्षता देशाच्या संस्कृती जपण्यासाठी महत्वाची आहे,” असं नायडू म्हणाले.

“आपण हिंदू धर्माचे आहोत याचा स्वामी विवेकानंद यांना अभिमान होता. या धर्माने देशाला सहनशक्ती, सर्वांना स्वीकारण्याची शिकवण दिली. सर्व धर्मांचे अस्तित्व स्वीकारणारा हिंदू हा एकमेव धर्म आहे. हेच हिंदू धर्माचे मोठेपण आणि सौंदर्य आहे,” असंही नायडू यावेळी म्हणाले. “भारताने कायमच वेगवेगळ्या देशातील पिडीतांना आश्रय दिला आहे. स्वामी विवेकानंद हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख करुन दिली. एका भाषणामध्ये त्यांनी, ‘इतर देशांनी छळ केलेल्यांना मोठ्या मनाने आश्रय देणाऱ्या देशातील मी नागरिक आहे,’ असं अभिमाने सांगितलं होतं हे आपण विसरता कामा नये,” असंही नायडू यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांचा मान राखणे हे भारतीयांच्या रक्तातच आहे असंही यावेळी नायडू म्हणाले. लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये असं सांगताना त्यांनी, “लोकांमध्ये असलेल्या मतभेदाच्या भिंती पाडण्याची आता सर्वाधिक गरज आहे. आपण भारतीय सर्व धर्म समभाव हे धोरण पाळतो. हे आपल्या रक्तात आहे आणि संस्कृतीमध्ये आहे,” असं म्हटलं.