Raja Raghuvanshi Murder Case : मेघालय पोलिसांनी शनिवारी इंदौर येथील उद्योजक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. राजा रघुवंशी याचा मे महिन्यात सोहरा येथे त्याच्या हनिमून दरम्यान मृतदेह आढळला होता. सोहरा येथील न्यायालयात सादर करण्यात आलेल्या या सविस्तर आरोपपत्रात पाच प्रमुख आरोपींची नावे आहेत. या आरोपपत्रात राजा रघुवंशीच्या हत्येचा कट नेमका कसा रचण्यात आला याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपास पथक (SIT)ने ७९० पानांचा आहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये राजाची रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांच्यासह विशाल सिंग चौहान, आकाश राजपूत, तसेच आनंद कुर्मी या तीन सुपारी घेतलेल्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३(१), २३८(अ), आणि ६१(२) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

तपासात सिद्ध झाले की सोनम रघुवंशी ही राज कुशवाह याच्याबरोबर नात्यात होती आणि तिने राज कुशवाह आणि तीन हल्लेखोरांबरोबर मिळून त्यांच्या हनिमूनदरम्यान राजा याची हत्या करण्याचा कट रचला होता, असे पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक स्ययम यांनी सांगितले.

तसेच या आहवालात राजाचा मृतदेह सापडल्यापासून ते उत्तर प्रदेशात सोनमला अटक होईपर्यंत सर्व घटनांची टाइमलाईन देण्यात आली आहे.

सोनमने राजाच्या हत्येचा कट कसा रचला?

तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी जिचा उल्लेख आरोपपत्रात क्रमांक एकची आरोपी असा आहे, तिने ११ मे रोजी इंदौर येथे राजाशी लग्न केल्यानंतरही राज कुशवाह याच्याशी नाते कायम ठेवले होते.

पोलिसांचा आरोप आहे की लग्नाच्या काही दिवसातच सोनम आणि कुशवाह यांनी राजाला हनिमून ट्रिपदरम्यान त्यांच्या मार्गातून दूर करण्याचा कट रचण्यास सुरूवात केली.

२० मे रोजी हे जोडपे शिलाँग आणि नंतर सोहरा येथे गेले. ज्या ठिकाणी हा कट प्रत्यक्षात आणण्यात आला. आरोपपत्रात असेही सांगण्यात आले की, सोनम आणि कुशवाह यांनी सुरूवातीला हत्येचे तीनदा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. मात्र अखेर ते त्यांची योजना पूर्ण करण्यात यशस्वी झाले. कुशवाह याने कथितपणे तीन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती, ज्यामधअये विशाल सिंह चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांचा समावेश होता.

लग्नाच्या अवघ्या १२ दिवसांनंतर २३ मे रोजी मारेकऱ्यांनी सोहरा येथील वेई Sawdong धबधब्याजवळ राजावर कोयत्याने हल्ला केला. त्यावेळी सोनम तेथेच हजर होती. नंतर त्यांनी राजाचा मृतदेह एका दरीत फेकून दिला, जो २ जून रोजी सापडला.

तपास सुरू झाल्यानंतर एका आठवडाभरात एसआयटीने सोनमला शोधून काढले आणि सोनम, कुशवाह आणि तीन मारेकऱ्यांना मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून अटक केली.

प्रकरणाची टाइमलाइन

मे ११ – राजा रघुवंशी याचे इंदौर येथे सोनमशी लग्न झाले.
२० मे – जोडपे शिलाँग येथे त्यांच्या हनिमूनसाठी दाखल झाले आणि ते सोहरा येथे गेले.
२३ मे – जोडपे नॉनग्रियाट होमस्टेमधून बाहेर पडले. याच दिवशी राजा याला शेवटचे जिवंत पाहिले गेले. कथितपणे Wei Sawdong धबधब्याजवळ खून करण्यात आला.
२६ मे – जोडपे बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली आणि मोठ्या प्रमणात शोध मोहिम सुरू झाली.
३१ मे – सोहरा येथील गोल्डन पाईन्स ढाबा येथे सोडून दिलेले स्कूटर आढळून आले.
२ जून – सोहरा येथील Arliang Riat Kunongrim येथील दरीत राजाचा मृतदेह आढळून आला.
८-११ जून – एसआयटीने सोनम, राज कुशवाह आणि इतर तीन आरोपींनी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातून अटक केले.
जून २२-२५ – जेम्स, तोमर आणि अहिरावर यांना मध्यप्रदेशतून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले.

या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली तीन आरोपींनी अटक करण्यात आली, ज्यामध्ये प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स, फ्लॅट मालक लोकेंद्र तोमर आणि सुरक्षा रक्षक बलबीर अहिरवार यांचा समावेश होता. हे तिघेही सध्या जामिनावर आहेत. तोमर आणि अहिरवार यांना सोहरा न्यायालयाने १२ जुलै रोजी जामीन मंजूर केला.