Sonam Raghuvanshi : सोनम आणि राजा रघुवंशीचं प्रकरण भारतात चर्चेत आहे. शिलाँग या ठिकाणी राजा आणि सोनम गेले होते. त्यानंतर हे दोघंही बेपत्ता झाले होते. एका मधुचंद्राचा शेवट भेसूर आणि क्रूर म्हणावा असाच झाला कारण २ जून रोजी पोलिसांना राजाचा मृतदेह सापडला. त्याचा मृतदेह सापडूनही सोनम बेपत्ता होती. दरम्यान ८ तारखेच्या रात्री उशिरा सोनम पोलिसांना शरण आली.
राजाच्या हत्येत सोनमचा सहभाग
राजा रघुवंशीच्या हत्येत सोनमचा सहभाग होता ही बाब समोर आली आहे. मेघालय पोलिसांनी हा दावा केला आहे. सोनम आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाहा या दोघांनीही मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला. राजा आणि सोनमचं लग्न ११ मे रोजी झालं. त्यानंतर २० तारखेला हे दोघंही मधुचंद्रासाठी रवाना झाले. सुरुवातीला बंगळुरु आणि त्यानंतर गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात हे दोघं गेले. आता कामाख्या मंदिरात राजाला सोनम का घेऊन गेली? याची माहिती समोर आली आहे.
राजाला कामाख्या मंदिरात सोनम का घेऊन गेली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमने राजाला हे पटवून दिलं की आपलं लग्न झालं आहे. आपल्याला लग्न पूर्णत्वास न्यायचं असेल आणि आपल्याला मनाने आणि शरीराने एकत्र यायचं असेल तर कामाख्या मंदिरात जाणं आवश्यक आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं की आपलं लग्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. राजालाही सोनमचं हे म्हणणं पटलं होतं त्यामुळे तो तिच्यासह बंगळुरुहून गुवाहाटीला गेला आणि तेथील कामाख्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली.
११ मे रोजी लग्न, २३ मे रोजी राजाची हत्या
सोनम आणि राजा यांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर हे दोघंही २० तारखेला हनिमूनला रवाना झाले होते. १८ मे रोजी सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला होता. राजाला आणि आपल्याला लुटण्यात आलं आणि पैशांसाठी लुटारुंनी राजाची हत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न सोनमने केला होता. या सगळ्यात तिला तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहानेही साथ दिली. या सगळ्यांना आता अटक करण्यात आली आहे. यानंतर या घटनेतले विविध पैलू समोर येत आहेत. आता सोनम राजाला कामाख्या मंदिरात का घेऊन गेली होती ही बाबही समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.