Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची तीन सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या घडवून आणली. या प्रकरणात फरार असलेली सोनम रघुवंशी ८ जूनच्या रात्री उशिरा पोलिसांना शरण आली. त्यानंतर आता या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. शिलाँग पोलिसांनी रविवारी या प्रकरणात सिलोम जेम्स या आणखी एका आरोपीला अटक केली. सिलोम जेम्सला घेऊन पोलीस कृष्णा विहार या सोसायटीत गेले होते. राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम जेव्हा इंदूरमध्ये परत आली तेव्हा ती याच सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये राहिली होती. तिची ब्लॅक बॅग याच सोसायटीतून गायब करण्यात आली. हनिमून हत्याकांड प्रकरण देशभरात गाजत असतानाच आता सिलोम जेम्सच्या अटकेमुळे या प्रकरणातील ब्लॅक बॅगचं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. सिलोम इंदूरमध्ये प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करतो.
सोनमच्या ब्लॅक बॅगमध्ये काय?
पोलिसांनी ज्या फ्लॅटमध्ये तपास केला तिथे त्यांना एका बॅगेचे जळालेले तुकडे मिळाले. हे तुकडे सोनमच्या बॅगचे असावेत अशी शक्यता आहे. या बॅगेतला ऐवज सिलोमने लपवल्याचा संशय पोलिसांना आहे. या बॅगेत मोठी रक्कम, इलेक्ट्रॉनिक उपकर आणि इतर पुरावे होते. राजाची हत्या केल्यानंतर ही बॅग घेऊन सोनम इंदूरला आली. तिने ही बॅग सिलोम जेम्सला दिली होती त्यानेच यातल्या गोष्टी सुरक्षित ठेवल्या आणि बॅग जाळली असा संशय पोलिसांना आहे. आता ब्लॅक बॅगचं रहस्य उलगडलं तर राजा रघुवंशीच्या हत्येचं रहस्यही उलगडू शकणार आहे असं पोलिसांना वाटतं आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

शिलाँग पोलिसांनी सिलोम जेम्सला रविवारी केली अटक
शिलाँग पोलिसांनी सिलोम जेम्सला रविवारी इंदूरहून अटक केली. आता त्याला मेघालय या ठिकाणी आणलं जाईल. त्याला ट्रांझिट रिमांमध्ये ठेवलं जाणार आहे आणि त्याची कसून चौकशी केली जाईल. राजाची हत्या कशी करायची याचा कट नेमका कसा शिजला? बॅगेत काय वस्तू होत्या? पैसे किती होते? या सगळ्या गोष्टींची उत्तरं सिलोमकडून मिळू शकतात अशी आशा पोलिसांना आहे. तसंच सिलोमची या सगळ्यात काय भूमिका होती? हेदेखील पोलिसांना समजणार आहे.
“सोनम रघुवंशीची ब्लॅक बॅग आणि त्यातला ऐवज हा राजा रघुवंशी हत्या प्रकरणातली महत्त्वाची रहस्य उलगडू शकणार आहे. बॅगेचे जळालेले अवशेष आम्हाला कृष्णा विहार फ्लॅटवर मिळाले आहेत. सिलोम जेम्सची चौकशी आम्ही करतो आहोत.“
शिलाँग पोलीस
सोनम रघुवंशीबाबत ही माहिती पोलिसांनी दिली आहे. आता तिच्या ब्लॅक बॅगचं काय झालं? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
विशाल चौहान या आरोपीने फ्लॅट भाडे तत्त्वावर घेतला
राजाची हत्या करणाऱ्या विशाल चौहानने ३० मे रोजी कृष्ण विहारमधला फ्लॅट भाडे तत्त्वावर घेतला होता. या फ्लॅटचं महिन्याचं भाडं १७ हजार रुपये आहे. सिलोमची आणि सोनमची ओळख विशालने करुन दिली. राजाची हत्या केल्यानंतर सोनम या फ्लॅटमध्ये लपली होती. त्यानंतर तिने बॅग सिलोमला दिली. त्याने त्यातला ऐवज सुरक्षित ठेवला आणि ही बॅग जाळली असा संशय पोलिसांना आहे. आता सिलोमच्या तपासात या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत.
सोनम आणि राज कुशवाहाने रचला राजाच्या हत्येचा कट
सोनम आणि राजा यांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर २० मे रोजी हे दोघंही हनिमूनला गेले. सुरुवातीला ते बंगळुरुला गेले. त्यानंतर गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले. २३ मे रोजी ते शिलाँगला गेले आणि तिथल्या इस्ट खासी हिल्समधून बेपत्ता झाले. राजाचा मृतदेह २ जून रोजी पोलिसांच्या ड्रोनला दरीत आढळून आला. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासह मिळून हत्येचा कट रचला होता. या प्रकरणात विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांच्यासह राज कुशवाहाला आणि सोनमला अटक करण्यात आली आहे.