Sonam Wangchuk : पर्यावरणवादी कार्यकर्ते व लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. लेहमध्ये आंदोलनात झालेल्या हिंसाचारासा वांगचुक जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला होता. यानंतर वांगचुक यांच्यावरील अनेक गंभीर आरोपांचा सध्या तपास केला जात आहे. यादरम्यान वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो (Gitanjali Angmo) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लेहमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांसाठी त्यांनी सुरक्षा दलांना जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी कथित संबंध असल्याच्या किंवा त्यांनी त्यांच्या संस्थांमार्फत पैशांचा अपहार झाल्याचे आरोपांना भक्कमपणे फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

त्या म्हणाल्या की, सोनम वांगचुक हे अनेक वर्षांपासून शक्य तेवढ्या गांधीवादी मार्गाने आंदोलन करत आहेत. पण सीआरपीएफच्या कारवाईमुळे २४ सप्टेंबर रोजी परिस्थिती चिघळली, ज्यामुळे चार लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी सांगितले होते की, जमावाने हिंसक वळण घेतल्यानंतर आणि भाजपाच्या स्थानिक कार्यालयाला आग लावण्यात आल्यानंतर आत्मरक्षणासाठी त्यांनी कारवाई केली.

हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टर्नेटिव्ह लर्निंग च्या सह-संस्थापक असलेल्या अंगमो यांनी सांगितले की, अटक करण्यात आल्यापासून त्या त्यांच्या पतीशी संपर्क साधू शकलेल्या नाहीत. वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) ताब्यात घेण्यात आल्यापासून त्यांना डिटेंशन ऑर्डर अद्याप दाखवण्यात आली नसल्याचेही त्या म्हमाल्या. लडाखला सहाव्या अनुसूचीचा दर्जा आणि राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी झालेले आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर दोन दिवसांनी वांगचूक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

लडाख येथील आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले वांगचुक हे सधअया राजस्थानच्या जोधपूर येथील कारागृहात आहेत.

पीटीआयशी फोनवर झालेल्या संभाषणात वांगचुक यांच्या पत्नीने लडाख यूटी पोलीस प्रमुख एस. डी. सिंग जामवाल यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. जामवाल यांनी वांगचुक यांच्या पाकिस्तानशी संबंध, ज्यामध्ये डॉन या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानला दिलेली भेट याचाही तपास केला जात असल्याचे म्हटले होते.

अंगमो म्हणाल्या की, पाकिस्तानला दिलेली भेट ही पूर्णपणे व्यावसायिक आणि हवामान केंद्रीत होती. वांगचुक यांचे सर्व परदेश दौरे नामांकित विद्यापीठे आणि संस्थांच्या निमंत्रणावरून झाले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“आम्ही संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या परिषदेला उपस्थित राहिलो झालो आणि ती हवामान बदलाशी संबंधित होती. हिमालयाच्या माथ्यावर असलेले ग्लेशियर वाहून पाकिस्तानात जाते की भारतात, हे पाहत बसणार नाही,” असे त्या पीटीआयशी बोलताना म्हणाल्या.

“मी देखील हवामान बदलातील महिलांची भूमिका या विषयावर एक पेपर सादर करण्यासाठी तेथे उपस्थित होते… खरं पाहिलं तर त्या कार्यक्रमात त्यांनी (वांगचुक यांनी) व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते,” असेही त्या म्हणाल्या.

वांगचुक हे एक हवामान कार्यकर्ते आहेत आणि लडाखचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर ते सातत्याने राज्याच्या दर्जासाठी आंदोलन करत आहेत.

४ सप्टेंबर रोजी आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने वांगचुक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) या संघटनेला दिलेला FCRA परवाना रद्द केला आहे.

वांगचुक पाकिस्तानात का गेले?

अंगमो यांनी सांगितले की, ‘ब्रीद पाकिस्तान’ ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाकिस्तान चॅप्टर आणि डॉन मीडियाने फेब्रुवारीमध्ये आयोजित केलेली परिषद होती आणि त्यात मल्टिनॅशनल सहकार्याचा समावेश होता.

अंगमो म्हणाल्या की, ” काही ICIMOD (इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट) सारख्या संस्था आहेत, ज्या सर्व आठही हिंदू कुश देशांना एकत्र आणून वेगवेगळ्या समस्यांवर काम करतात. आम्ही ICIMOD च्या हिमालयन युनिव्हर्सिटी कन्सोर्टियमचा भाग आहोत.”

द इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) ही नेपाळमधील संघटना असून तिची स्थापना १९८३ मध्ये झाली आहे. या संघटनेमध्ये हिंदू कुश हिमालय भागातील आठ प्रादेशिक सदस्य देशांचा समावेश आहे. भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान यांचा यामध्ये समावेश आहे.

त्यांनी वांगचुक यांना नकारात्मक पद्धतीने दाखवले जात असल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, “जी व्यक्ती भारतीय लष्करासाठी शेल्टर्स तयार करण्याबद्दल आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलत आहे, त्याला तुम्ही देशविरोधी कशी ठरवू शकता?”

पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू शकते तर…

दुबई येथे असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानात झालेल्या हवामान परिषदेत सहभागी झाल्यावरून वांगचुक यांच्यावर आरोप होत आहेत, यावर

“जर भारत पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू शकतो, तर त्याचा एक हिरो (सोनम वांगचुक), तेथील युएनच्या परिषदेला का उपस्थित राहू शकत नाही?” असे गितांजली एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.