भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. करोनाचं गहिरं संकट देशावर आहे. अशात तपासणी फक्त १५०७१ लोकांची झाली आहे. इतरांची का नाही? असा प्रश्न उपस्थित करत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा करोनाशी दोन हात करण्याच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आत्तापर्यंत अवघ्या १५०७१ लोकांना तपासण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जे पॉझिटिव्ह आहेत किंवा जे संशयित आहेत त्यांच्यापर्यंत तपासणीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त विभागवार तपासण्या झाल्या पाहिजेत अशीही मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

करोना व्हायरससोबत दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना एक होण्यास सांगितलं आहे. मात्र तपासणीची व्याप्ती वाढवली पाहिजे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर लघू आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योजकांसाठी सरकारने मदतीचं पॅकेजही जाहीर केलं पाहिजे. करोनासारखं संकट गडद होत असताना छोट्या व्यापाऱ्यांनी काय करायचं? असाही प्रश्न त्यांनी विचारला. तसंच बाजारात मास्क, सॅनिटायझर, अन्नपदार्थ यांची कमतरता भासू नये यासाठीही सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

“करोना व्हायरसची दहशत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. लोक चिंतेत, काळजीत आहेत. या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपण एक दृढ संकल्प केला पाहिजे. ” असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.