सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मोदी सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. मुख्य माहिती आयुक्त पद भरण्यास दिरंगाई करणाऱ्या केंद्र सरकारचा ‘आरटीआय’ कमकुवत करण्याचा डाव असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी, नेट न्यूट्रॅलिटीवरून सरकारवर टीका केल्यानंतर सोनिया गांधी यांनी मुख्य माहिती आयुक्ताच्या रिक्त पदावरून केंद्र सरकारवर शरसंधान केले. विशेष म्हणजे केंद्रीय दक्षता आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती थेट पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित विषय आहे, त्यामुळे एक प्रकारे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात मुख्य माहिती आयुक्त वा केंद्रीय दक्षता आयुक्तपद कधीही रिक्त नव्हते. त्यामुळे पंतप्रधान मोदीभ्रष्टाचाराचे उच्चाटन, पारदर्शी कारभार, सुशासनावर  केवळ आश्वासनेच देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सोनिया यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी भाजप खासदारांनी एकदाही अडथळा आणला नाही. याउलट राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान भाजप खासदार सतत शेरेबाजी, टिप्पणी करीत असत. माहिती अधिकार कायदा लागू करण्याचे श्रेय संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला देत सोनिया गांधी म्हणाल्या की, माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचा सरकारचा डाव आहे. सामान्य नागरिकांना माहिती वेळेवर मिळत नाही. वेळेवर माहिती न देणे म्हणजे माहिती नाकारण्यासारखे आहे. जागल्यांना (व्हिसलब्लोअर) संरक्षण देणाऱ्या विधेयकास अद्याप राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली नाही. देशातील निम्म्यापेक्षा जास्त माहिती आयुक्तांच्या कार्यालयात सुविधांचा अभाव आहे. ही यंत्रणा निष्प्रभ करण्याचा योजनाबद्ध प्रयत्न सरकार करीत आहेत.
केंद्रीय दक्षता आयुक्ताचे पदही रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या सरकारला खरोखरच कामकाजात पारदर्शकता आणायची आहे का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. गांधी यांच्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदार बाके वाजवून त्यांचे समर्थन करीत होते. सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी पक्षाचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi hits out at pm modi govt
First published on: 07-05-2015 at 01:30 IST