पीटीआय, नवी दिल्ली : दोन महिने करोना संसर्ग झाल्यानंतर नुकत्याच बऱ्या झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पुन्हा करोनाचा संसर्ग झाला. शनिवारी त्यांच्या करोनाविषयक चाचण्यांत हा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने त्या पुन्हा विलगीकरणात राहणार आहेत.

या आठवडय़ाच्या सुरुवातीला त्यांची कन्या आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनाही करोना संसर्ग झाला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या संदर्भात ‘ट्वीट’ करताना नमूद केले आहे, की सोनिया गांधी यांच्या शुक्रवारी करण्यात आलेल्या चाचणीत करोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे नियमानुसार त्या विलगीकरणात राहतील. सोनियांना जूनच्या प्रारंभी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर ७५ वर्षीय सोनिया यांना सर गंगाराम रुग्णालयात १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांना २० जूनला रुग्णालयातून सोडण्यात आले.

काँग्रेसच्या अधिकृत ‘ट्विटर हँडल’वर नमूद केले आहे, की सोनिया गांधींच्या शुक्रवारी करण्यात आलेल्या करोना चाचणीत त्यांना करोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले असून, त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन त्यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी, अशा आमच्या  सद्भावना आहेत.