भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संचालक सौम्या स्वामिनाथन यांची संयुक्त राष्ट्रांच्या जीवाणूविरोधी लढ्यासाठीच्या उच्चस्तरीय गटात नेमणूक करण्यात आली आहे.
त्या जीवाणू प्रतिरोध तज्ज्ञ म्हणून या गटात सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यानी त्यांची नेमणूक केली आहे. स्वामिनाथन (वय ५७) यांची जीवाणूरोधक समन्वय गटात नेमणूक झाली असून या गटात उप सरचिटणीस अमीन महंमद या सहअध्यक्ष असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक मार्गारेट चॅन यांनी सांगितले.




स्वामिनाथन या भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आहेत. त्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. क्षयावर त्यांनी संशोधन केले असून १९९२ मध्ये त्या चेन्नईतील क्षयरोग संशोधन केंद्रात काम करू लागल्या. गेली २३ वष्रे त्या आरोग्य संशोधनात काम करीत आहेत.
निओनॅटोलॉजी अँड पेडिअट्रिक पलमॉनॉलॉजी या विषयात त्यांना दक्षिण कॅलिफोíनयातील लॉस एंजल्स रूग्णालयाची शिष्यवृत्ती मिळाली होती. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिसिजेस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एचआयव्ही विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत.
पुण्याच्या एएफएमसी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वज्ञिान केंद्रातून बालवैद्यकीत एमडी केले.
जीवाणू प्रतिबंध उपाययोजना गटात संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे प्रतिनधी, आरोग्य तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे. यात जीवाणूं प्रतिरोधकता वाढवण्यासाठी जागतिक कृती योजना तयार केली जाणार आहे. गटाची बठक येत्या काही आठवड्यात होत असून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.
जीवाणू, बुरशी, विषाणू व परोपजीवी सजीव यांना जेव्हा प्रतिजैविकांची सवय होते तेव्हा ते औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे कुठल्याही औषधांना दाद न देणारे महाजीवाणू म्हणजे सुपरबग्ज तयार होत आहेत. त्यामुळे औषधे निष्प्रभ ठरून संसर्ग वाढत आहे.