वृत्तसंस्था, पॅरिस

टेनिसचे भविष्य म्हणून पाहिले जात असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने आपला लौकिक पुन्हा एकदा सिद्ध करताना कारकीर्दीत प्रथमच फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. ‘लाल मातीचा बादशाह’ समजला जाणारा राफेल नदाल नसला, तरी या वेळी फ्रेंच स्पर्धेत स्पेनच्याच खेळाडूची मक्तेदारी कायम राहिली. अल्कराझने रविवारी जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवचे आव्हान साडेचार तासाच्या मॅरेथॉन लढतीत ६-३, २-६, ५-७, ६-१, ६-२ असे परतवून लावले. या पराभवामुळे झ्वेरेवचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले.

अंतिम लढतीत अल्कराझने एका ब्रेकच्या संधीसह पहिला सेट सहज जिंकून दमदार सुरुवात केली. मात्र, झ्वेरेवने नंतर आपली चिकाटी दाखवून देताना लढतीमधील रंगत वाढवली. दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझची सर्व्हिस दोन वेळा तोडत झ्वेरेवने बरोबरी साधली. झ्वेरेवनेच तिसरा सेट २-५ अशा पिछाडीनंतर सलग पाच गेम जिंकून ७-५ असा आपल्या नावे केला. सलग दोन सेट जिंकल्यानंतर झ्वेरेवचा खेळ उंचावणे अपेक्षित होते. मात्र, अल्कराझने लहान वयातील आपली प्रगल्भता दाखवून देत चौथ्या सेटमध्ये झ्वेरेवला केवळ एकच गेम जिंकू दिला. दोन सेटच्या बरोबरीनंतर निर्णायक पाचव्या सेटमध्ये अल्कराझने तिसऱ्या गेममध्ये झ्वेरेवची सर्व्हिस तोडत आघाडी मिळवली. या सेटच्या चौथ्या गेममध्ये अल्कराझला सर्व्हिस राखण्यासाठी झगडावे लागले होते. परंतु सातव्या गेममध्ये पुन्हा एकदा ब्रेकची संधी साधल्यावर अल्कराझने आठव्या गेममध्ये सर्व्हिस राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा >>>IND vs PAK, T20 WC 2024 : रोहितकडून सलग सहाव्यांदा भारतीय चाहत्यांचा हिरमोड, पाकिस्तानविरोधातील हाराकिरी कायम, पाहा आजवरची कामगिरी

२१ वर्षीय अल्कराझचे हे कारकीर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. याआधी त्याने अमेरिकन खुली (२०२२) आणि विम्बल्डन (२०२३) ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. यंदा नदाल पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर आणि नोव्हाक जोकोविचला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर अल्कराझलाच अजिंक्यपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. त्याने अपेक्षेप्रमाणेच खेळ केला.

● फ्रेंच स्पर्धा जिंकणारा स्पेनचा सातवा खेळाडू. यापूर्वी राफेल नदाल (१४ वेळा), सर्गी ब्रुगएरा (२), ज्युआन कार्लोस फेरेरो (१), अल्बर्ट कोस्टा (१), कार्लोस मोया (१), आंद्रेस गिमेनो (१) या स्पेनच्या खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्या तीन अंतिम सामन्यांत विजेतेपद मिळवणारा अल्कराझ हा रॉजर फेडरर, स्टॅन वावरिंका, गुस्वात क्युएर्टन, स्टिफन एडबर्ग, बियॉर्न बोर्ग आणि जिमी कॉनर्स यांच्यानंतरचा पहिला टेनिसपटू.