भारतात मोटारसायकलवर पर्यटन करण्यासाठी निघालेल्या स्पॅनिश महिलेवर झारखंडच्या डुमका जिल्ह्यात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या पतीसह मोटारसायकल ट्रिपवर निघाली होती. बिहारच्या भागलपूर येथे जात असताना त्यांनी झारखंडच्या डुमकी मार्केटनजीक एका निर्जन स्थळावर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान पीडितेवर अत्याचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याला मारहाणदेखील झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यावर काही स्थानिक टोळक्याची नजर पडली. त्यांनी स्पॅनिश जोडप्याची छेडछाड केली आणि त्यानंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर ३५ वर्षीय पीडित महिलेने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला थांबवून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. शुक्रवारी (दि. १ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दिल्लीत तळ ठोकून बसलेले झारखंड काँग्रेसचे आठ आमदार परतले, राजकीय समीकरण बदलणार?
डुमका जिल्ह्याचे शल्यचिकित्सक बी. पी. सिंह यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, एका विदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मला सांगितले गेले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला असून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनुसार सदर महिलेचे वय ३५ असल्याचे कळते.
डुमकाचे पोलीस अधिक्षक पितांबर सिंह खेरवार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, काल रात्री जेव्हा सदर पीडित महिला पोलिसांना आढळून आली, तेव्हा तिने तिच्यावर घडलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती स्पॅनिश इंग्रजी बोलत असल्यामुळे पोलिसांना काही समजले नाही. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर प्रकरण सामूहिक बलात्काराचे असल्याचे कळले. महिलेने आरोपींचे जे वर्णन केले, त्यावरुन तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडितेने एकूण सात आरोपी असल्याचे म्हटले आहे. इतरांनाही शोधण्यासाठी आम्ही पथक तयार केले आहे.
बांगलादेशहून नेपाळकडे प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, हे स्पॅनिश जोडपे मोटारसायकलवरून बांगलादेशहून आले होते. त्यांना नेपाळमध्ये जायचे होते. यासाठी ते डुमकामार्गे बिहारच्या भागलपूर येथे जायला निघाले होते. मात्र रात्र झाल्याने त्यांनी डुमका येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पर्यटनासाठी त्यांच्याकडे तंबू आणि निवासाचं सामान होतं. डुमकीच्या मार्केटजवळ निर्जन स्थळी त्यांनी तंबू उभारला होता. यावेळी टोळक्याने जोडप्याला मारहाण करत महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समजते.
झारखंड पर्यटनाच्या लायक नाही
या घटनेनंतर देशभरातील बाईक राइडर मंडळी आता सोशल मीडियावरून निषेध व्यक्त करत आहेत. स्पॅनिश जोडप्याने त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. झारखंड पर्यटनासाठी योग्य नाही, अशाही प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.