नवी दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथेून काल(शुक्रवारी) एका मोस्ट वाँटेड गँगस्टरच्या मुसक्या आवळल्या.काला जेठेडी उर्फ संदीप असे त्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. काला जेठडीवर दिल्ली पोलिसांनी सात लाख रुपयांचा इनाम देखील ठेवलेला होता. याचबरोबर त्याची सहकारी लेडी डॉन अनुराधा हिला देखील अटक करण्यात आलेली आहे.

दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या काउंटर इंटेलिजन्सच्या डीसीपी मनिषा चंद्र यांनी सांगितले की, शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील सहारनपुर येथून मोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडीला अटक करण्यात आली आहे. काला जेठडीच्या विरोधात दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

तसेच, काला जेठडीची गँग लूटमार आणि हत्या या गुन्ह्यांसोबतच खंडणी वसूली देखील करत होती. प्राप्त माहितीनुसार काला जेठडी सध्या लॉरेन्स बिश्नोई गँग चालवत होता. लॉरेन्स बिश्नोईला अटक झाल्यानंतर त्याची गँग थायलंडवरून राजू बसौदी चालवत होता. मात्र त्याच्या अटकेनंतर काला जेठडी ही गँग सक्रीयपणे चालवत होता. मागील वर्षी गुडगाव पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर काला जेठडीला सोडवलं गेलं होतं. तेव्हापासून तो फरार होता.

लेडी डॉन अनुराधाला देखील अटक  –

याशिवाय दिल्लीच्या स्पेशल सेलने लेडी डॉन अनुराधाला देखील अटक केली आहे. जी गँगस्टर काला जेठडीची सहकारी आहे. राजस्थानमध्ये अनुराधा विरोधात हत्या, अपहरणासारख्या गुन्हे दाखल आहेत. शिवाय, तिच्यावर १० हजार रुपयांचा इनाम होता.