देशात बेरोजगारीचे चित्र किती विदारक आहे, याची अनेक उदाहरणे रोज प्रत्ययास येत असतात. उत्तर प्रदेशच्या कनौज येथे बेरोजगारीचे भीषण चित्र दाखविणारा प्रसंग घडला आहे. नोकरी मिळत नसल्यामुळे येथील युवकाने स्वतःची पदवी आणि शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकली आणि त्यानंतर आत्महत्या केली. ब्रिजेश पाल (२८) असे या युवकाचे नाव आहे. “गेली अनेक वर्ष मी शिक्षण घेत आहे, तरीही मला नोकरी मिळत नाही. म्हणून मी स्वतःला संपवत आहे”, अशी उद्विग्न भावना ब्रिजेशने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार, ब्रिजेशने नुकतीच पोलीस भरती परिक्षा दिली होती. तसेच पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, ब्रिजेशने घरीच गळफास घेऊन स्वतःला संपवलं
ब्रिजेशने चिठ्ठीत लिहिले, “मी माझ्या आई-वडिलांचा विश्वास सार्थ करू शकलो नाही. माझ्या निधनानंतर कुणालाही त्रास देऊ नका. माझ्या मृत्यूसाठी मीच जबाबदार आहे. मला आता जगण्याची उमेद राहिली नाही. मला काहीच अडचणी नाहीत. आता मी थांबण्याचा निर्णय घेतला असून सर्वांना सोडून जात आहे.”
फोटो पाहून प्रेम, लग्नासाठी व्यावसायिक महिलेनं केलं मुलाचं अपहरण; गुन्हा दाखल
“मला तुम्ही माफ कराल, अशी आशा करतो. माझा आज शेवटचा दिवस आहे. मी आईबरोबर जेवण घेतलं. आज मी माझ्या आई-वडीलांचा विश्वासघात करत आहे. माझ्या जाण्यानंतर वडिलांची काळजी घ्या, आपली इथपर्यंतच सोबत होती. मी आता या जगात नसताना माझी बहीण संगीताचा विवाह योग्य पद्धतीने करा”, असेही ब्रिजेशने चिठ्ठीत लिहिले.
चिठ्ठीच्या अगदी शेवटी ब्रिजेश लिहितो की, त्याने त्याच्या बी.एससी पदवीशी निगडित सर्व कागदपत्रे जाळून टाकली आहेत. जर नोकरीच मिळणार नसेल तर अर्धे आयुष्य शिक्षण घेण्यात का घालवायचे? असा सवाल त्याने उपस्थित केला. माझे अर्धे आयुष्य याच्यातच गेले, मी आता हे इथेच थांबवत आहे.
ब्रिजेश पालचे वडील दिल्लीत नोकरी करतात. गावाकडे त्यांची चार बिघा जमीन आहे. पालकांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ब्रिजेशने नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र पेपरफुटी प्रकरणामुळे तो नाराज होता.
ब्रिजेश पालच्या आत्महत्येनंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक्स वर पोस्ट टाकून भाजपा सरकारवर निशाणा साधला. भाजपाच्या राज्यात बेरोजगारी फोफावली असल्यामुळे तरूणांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. “मी सर्व युवांना आवाहन करू इच्छितो की, आत्महत्या करणे हा पर्याय असू शकत नाही. संघर्ष करूनच आपण या समस्येवर मात करू शकतो. भाजपाच्या राज्यात रोजगार मिळेल, ही अपेक्षा ठेवणे चूक आहे”, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.