पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा मार्ग अडवला होता. मागच्या महिन्यात २३ सप्टेंबरला ही घटना घडली. पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी स्पाइसजेटचे विमान उड्डाणवस्थेत असताना  इंटरसेप्ट केले. नंतर पाकिस्तानच्या हवाई हद्दीबाहेर जाईपर्यंत स्पाइसजेटच्या त्या विमानाला संरक्षणही दिले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पाइसजेटच्या बोईंग ७३७ विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर कॉल साइनवरुन गोंधळ निर्माण झाला असे डीजीसीएमधील सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानी एअर फोर्सने स्पाइसजेटच्या विमानाला उड्डाणाची उंची कमी करण्यास सांगितले तसेच एफ-१६ विमाने स्पाइस जेटच्या दिशेने झेपावली होती. स्पाइसजेटच्या वैमानिकाने पाकिस्तानी एअर फोर्सच्या वैमानिकांबरोबर संवाद साधला व व्यावसायिक विमान असल्याची माहिती दिली.

पाकिस्तानी वैमानिकांची खात्री पटल्यानंतर स्पाइसजेटच्या विमानाला अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करेपर्यंत संरक्षण देण्यात आले. हा संवेदनशील विषय असल्याने डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी आणखी माहिती देण्यास नकार दिला. स्पाइस जेटने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

२६ फेब्रुवारीच्या बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पण त्यामध्ये पाकिस्तानचे दुप्पट नुकसान होत असल्यामुळे जुलै महिन्यात त्यांनी भारतीय विमानांसाठी अंशत: हवाई हद्द खुली केली. मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी पाकिस्तानने नाकरली होती. सध्या दोन्ही देशांमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicejet delhi kabul flight intercepted by pakistan air force dmp
First published on: 17-10-2019 at 16:58 IST