माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे निकटवर्तीय आणि वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. चंद्रास्वामी हे नरसिंहराव हे पंतप्रधानपदी असताना चर्चेत आले होते.
१९४८ मध्ये जन्मलेल्या चंद्रास्वामी यांचे खरे नाव नेमिचंद होते. जैन समुदायाशी संबंध असलेले चंद्रास्वामी लहानपणीच वडीलांसोबत हैदराबादमध्ये गेले होते. मोठमोठ्या नेत्यांपासून ते सिनेसृष्टी आणि गुन्हेगारी क्षेत्रातील डॉन अशा विविध क्षेत्रातील मंडळी चंद्रास्वामी यांचे भक्त होते. दिवंगत पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे ते अध्यात्मिक गुरु होते. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर चंद्रास्वामी प्रसिद्धीझोतात आले होते. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर चंद्रास्वामी यांनी दिल्लीत आश्रम बांधले होते. या आश्रमासाठी इंदिरा गांधी यांनी जमीन दिल्याचे सांगितले जाते.
[jwplayer mxWbhw09-1o30kmL6]
ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यादेखील चंद्रास्वामी यांच्या भक्त होत्या. याशिवाय हॉलीवूडमधील अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, बहरीनचे राजे यांचाही चंद्रास्वामींच्या भक्तांमध्ये समावेश होता. चंद्रास्वामी हे वादग्रस्त तांत्रिक म्हणून प्रसिद्ध होते. लंडनमधील एका व्यावसायिकाला एक लाख डॉलरचा गंडा घातल्याप्रकरणी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. याशिवाय परकीय चलन कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक खटले सुरु होते. राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्यांना पैसे पुरवण्यातही चंद्रास्वामींचा सहभाग होता असा आरोपही त्यांच्यावर झाला होता. २००९ मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांच्या परदेशवारीवरील निर्बंध हटवले होते.
अपोलो रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार चंद्रास्वामी यांना काही दिवसांपूर्वी पक्षाघात झाला होता. यानंतर त्यांचे काही अवयवदेखील निकामी झाले होते. मंगळवारी दुपारी उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले असे रुग्णालयाने म्हटले आहे.
[jwplayer H0nPq9hf-1o30kmL6]