आयपीएलमध्ये बेटिंगसाठी सट्टेबाजांना मदत केल्याचा आरोप असलेले आंतरराष्ट्रीय पंच असद रौफ यांना भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिस प्रत्यार्पण कायद्यानुसार कारवाई सुरू करण्याची शक्यता आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू आणि काही सट्टेबाजांना अटक केल्यानंतर घाबरलेले रौफ गेल्या २१ मे रोजी रौफ पाकिस्तानात पळून गेले आहेत. 
अभिनेता विंदू दारा सिंग याच्याकडून पोलिसांना रौफ हे सट्टेबाजांना मदत करत असल्याची माहिती मिळाली. दुबईला पळून गेलेले सट्टेबाज पवन आणि संजय जयपूर यांनी रौफ यांना वेगवेगळे गिफ्ट दिल्याची माहिती विंदूने पोलिसांना दिलीये. त्याचबरोबर रौफ सट्टेबाजांना खेळपट्टी आणि हवामानाबद्दलही माहिती देत असल्याचे तपासात आढळून आलेय. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रौफ यांची चौकशी करण्यासाठी हातपाय हलवण्यास सुरूवात केली. त्यांना पाकिस्तानातून भारतात आणल्यास त्यांच्याकडे चौकशी करून यासंदर्भातील सखोल तपास करण्याचा मुंबई पोलिसांचा विचार आहे.
सट्टेबाज पवन आणि संजय जयपूर यांनाही दुबईतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱयांनी दिली.

Story img Loader