Pakistani Spy Network In India: पाकिस्तानी गुप्तहेर रॅकेट विरोधातील कारवाई दरम्यान भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंगला अलिकडेच अटक केली होती. त्याच्या अटकेनंर केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. जसबीर सिंगने सहा वेळा पाकिस्तानचा दौरा केला असून, त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानमधील सुमारे १५० जणांचे संपर्क क्रमांक आढळले आहेत.याचबरोबर अटकेनंतर जसबीर सिंगने पोलिसांसमोर खुलासा केला आहे की, त्याने सुमारे एक तासासाठी त्याचा लॅपटॉप पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याला दिला होता.
शिवाय, युट्यूबर ज्योती मल्होत्रासह पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अनेकांप्रमाणे, जसबीर सिंग देखील इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) चा ऑपरेटिव्ह दानिश उर्फ एहसान-उर-रहमान याच्या संपर्कात होता, जो दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता. पंजाबमधील मोहाली येथील न्यायालयात जसबीर सिंगने सांगितले की, त्याच्या एका मैत्रिणीने त्याची दानिशशी ओळख करून दिली होती.
जसबीर सिंगने पोलिसांना असेही सांगितले की, दानिशने त्याच्याकडून काही सिम कार्ड मागवले होते. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर हेरगिरी रॅकेटशी त्याचा संबंध असल्याचे आढळल्यानंतर दानिशला नवी दिल्लीतून हाकलून लावण्यात आले होते.
जसबीर सिंगच्या पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान, आज जसबीर सिंग याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना ४ जून रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी दावा केला होता की, सिंगने पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्करी अधिकाऱ्यांशी संबंधित हेरगिरी रॅकेटची माहिती उघड केली आहे.
२०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये पाकिस्तान दौरा
यापूर्वी, जसबीर सिंग पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ जुट रंधावाशी संबंधित असल्याचे आढळून आले होते. तो २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यादरम्यान आयएसआय अधिकाऱ्यांशी थेट संपर्कात आल्याचे त्याने पोलिस चौकशीत उघड केले होते. माजी पाकिस्तानी पोलीस अधिकारी नासिर ढिल्लन याने त्याची लाहोरमधील आयएसआय अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती.
हेरगिरी रॅकेटमध्ये माजी पाकिस्तानी पोलिसांचा सहभाग
सुरक्षा यंत्रणांना असाही संशय आहे की, पाकिस्तान पोलिसांचे शेकडो माजी कर्मचारी हेरगिरी रॅकेटचा भाग आहेत, जे भारतीय यूट्यूबर्सना लक्ष्य करत आहेत.