दोन कोटी २० लाख लोकसंख्येचे श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. श्रीलंकेत तीव्र परकीय चलन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन, अन्नधान्य आणि औषधांच्या आयातीवर मर्यादा आली आहे. सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याने गेल्या-पाच सहा महिन्यांपासून नागरिक सरकारविरोधात असंतोष व्यक्त करीत आहेत. त्यातच आंदोलकांनी शनिवारी अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला.

Sri Lanka Crisis: राष्ट्रपती भवनाचा ताबा मिळवताच आंदोलकांनी स्विमिंग पूलमध्ये मारल्या उड्या, जीममध्ये केला व्यायाम

श्रीलंकेच्या अध्यक्षीय प्रासादात आंदोलकांचे ठाण; राजपक्षे, विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यावर निदर्शक ठाम

अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी तेथील सुविधांचा लाभ घेत असतानाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आंदोलक स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत असून, जीममध्ये व्यायाम करत आहेत. याशिवाय आंदोलक घऱातील बेडवर आराम करत असल्याचेही व्हिडीओ समोर आले आहेत. यादरम्यान पंतप्रधानांच्या निवासस्थानी बेडवर आंदोलक WWF खेळताना दिसत आहेत.

Sri Lanka Tweet या अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यामध्ये काही आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी बेडवर कुस्ती खेळत असल्याचं दिसत आहे.

अर्थजर्जर श्रीलंकेतील सरकारविरोधी आंदोलकांनी शनिवारी अध्यक्षीय प्रासादाचा ताबा घेतल्यापासून तेथेच ठाण मांडलं आहे. प्रासादातील सर्वच खोल्यांमध्ये निदर्शकांचा वावर असल्याचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले आहेत. निदर्शकांनी राजपक्षे यांच्या प्रासादातून कोटय़वधी रुपये जप्त केल्याचा दावा केला. आम्ही हाल सोसत असताना अध्यक्ष मात्र मौजमजा करीत होते, अशी प्रतिक्रिया सरकारविरोधी आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या घराला आग

आंदोलक शनिवारी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या घराकडे निघाले होते. पोलिसांनी यावेळी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला, तसंच अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, यावेळी सुरक्षा जवानांनी एका पत्रकाराला मारहाण केली. पत्रकाराला मारहाण झाल्याची माहिती मिळताच आंदोलक आक्रमक झाले आणि घराला आग लावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लष्करप्रमुखांचे शांततेचे आवाहन

देशावरील राजकीय संकट दूर झाले असून, शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शैवेंद्र सिल्वा यांनी रविवारी केले. सध्याच्या प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याची संधी आता उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय निवासात पावणेदोन कोटी

श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसलेल्या आंदोलकांना तेथे एक कोटी ७८ लाख रुपये सापडल्याचा दावा करण्यात आला. समाजमाध्यमांतून प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. आंदोलकांनी ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली.