कोलंबो : श्रीलंकेतील आजवरचे सर्वात भीषण आर्थिक संकट हाताळू न शकल्यामुळे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी येथील एका प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर गेला महिनाभराहून अधिक काळ निदर्शक तळ ठोकून आहेत. त्यांना अध्यक्षांनीच नेमलेले देशाचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पाठिंबा जाहीर केल्याची असाधारण घटना घडली आहे.

९ एप्रिलपासून कोलंबोच्या गॅले फेस ग्रीन येथे तळ ठोकलेल्या ‘गोता गो होम’ निदर्शकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आपण एक समिती नेमली असल्याचे पंतप्रधानांनी शनिवारी सांगितले. आपले मोठे बंधू महिंदू राजपक्षे यांना पद सोडण्यास सांगितल्यानंतर अध्यक्ष गोताबया यांनी विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली होती. या खेडय़ातील तरुण निदर्शकांचे रक्षण केले जाईल. भविष्यकालीन धोरणाला आकार देण्यासाठी त्यांची मते विचारात घेतली जातील, असे विक्रमसिंघे म्हणाले. देशातील राजकीय यंत्रणेत बदल घडवून आणण्यासाठी ‘गोता गो होम’ आंदोलन सुरू राहायला हवे असे ते म्हणाले.