जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फरनगर या दोन शहरांना जोडणाऱ्या वाहतूक सेवेला पुन्हा प्रारंभ होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र ती पुन्हा सुरू करण्यास दोन्ही देशातील प्रशासनाने परवानगी दिली आहे.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून १०० कोटींची ब्राऊन शुगर घेऊन येणाऱ्या एका ट्रकचालकाला अटक केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र तीन फेब्रुवारीपासून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे.
उत्तर काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ कामण पोस्ट येथे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी भारतीय अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी वाहतूक पूर्ववत करण्यात मंजुरी दिली आहे. मात्र या मार्गावरून कोणत्याही मालाची ने-आण करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या आठवडय़ातही या संदर्भात दोन्ही देशांची बैठक झाली होती. मात्र काही कारणास्तव या बैठकीतील चर्चा फिस्कटली. त्यामुळे गुरुवारी पुन्हा चर्चा करण्यात आली.