स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीवरून आंध्र प्रदेशात सुरू असलेला जनक्षोभ मिटण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सीमांध्र भागात विविध ठिकाणी आंदोलन सुरू होते. विजयनगर शहरात त्याची तीव्रता अधिक असून पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांना अटक केली आहे. सीमांध्र भागात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे रविवारपासून येथील वीजपुरवठा ठप्प आहे.
तेलंगण निर्मितीला सीमांध्र भागात तीव्र विरोध असून कृष्णा, पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, नेल्लोर, राजम या जिल्ह्य़ांत तेलंगणविरोधात आक्रमक आंदोलने होत आहेत. वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी काँग्रेसचे खासदार व आमदारांच्या घरांवर मोर्चे नेत त्यांचा तीव्र निषेध केला. विशाखापट्टणममध्ये वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांच्या कार्यालयावरच मोर्चा नेला. पुरंदेश्वरी यांनी तेलंगणला विरोध करून राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी होती.
काकिनाडा येथेही वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या घरासमोर निदर्शने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी राज्यातील काँग्रेसचे खासदार व आमदार यांनाही लक्ष्य केले. तेलंगणला विरोध करून या सर्वानीच राजीनामे द्यावेत, अशी मागणी ठिकठिकाणच्या आंदोलकांनी केली. विजयनगर शहरात तर आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यामुळे पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमार करावा लागला. पोलिसांनी ३४ आंदोलकांना अटक केली. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
वीजपुरवठा ठप्प
सीमांध्र भागातील वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेलंगणविरोधी आंदोलनात भाग घेतल्याने या ठिकाणचा वीजपुरवठा रविवार रात्रीपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील सर्व जनजीवन ठप्प झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सीमांध्र भागातील रणकंदनाची दखल घेऊन तेलंगण निर्मितीला स्थगिती द्यावी, या आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी तेलंगणच्या मुद्दय़ावरून तेलुगु जनतेच्या भावनांची कदर केली जाईल, असे सोमवारी स्पष्ट केले.