पीटीआय, नवी दिल्ली

न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) एकत्रीकरण केल्याने नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक प्रश्न उपस्थित होतात असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी व्यक्त केले. या प्रक्रियेची कसून तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयांच्या दोन दिवसीय परिषदेच्या वेळी सरन्यायाधीश बोलत होते. या परिषदेत तंत्रज्ञान आणि संवाद या मुद्द्यांवर उहापोह करण्यात येत आहे. न्या. चंद्रचूड म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही कल्पकतेची पुढील आघाडी आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये त्याचा वापर ही संधी आणि आव्हान हे दोन्ही आहे. त्याच्या सूक्ष्म विवेचनाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, ‘‘एकीकडे ‘एआय’मुळे अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत; त्याचवेळी त्यामुळे अनेक क्लिष्ट आव्हाने निर्माण झाली आहेत. विशेषत: नीतिमत्ता, दायित्व आणि पक्षपातीपणा याबाबतीत हे प्रश्न उपस्थित होता. या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगभरात सर्व भौगोलिक आणि संस्थात्मक सीमा ओलांडून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे’’.सिंगापूरच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन यावेळी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर अन्य अनेक न्यायाधीश आणि तज्ज्ञांनीही या परिषदेला हजेरी लावली आहे.