scorecardresearch

पंजाबमध्ये शिवसेनेच्या खलिस्तानविरोधी मोर्चात राडा; तुफान दगडफेक, भररस्त्यात तलवारीही उपसल्या

या प्रकरणाची दखल थेट पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही घेतली असून यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिलीय.

Punjab
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही यावर नोंदवली प्रतिक्रिया (फोटो व्हायरल व्हिडीओवरुन साभार)

पंजाबमधील पतियाला येथे आज दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान संघर्ष जाला. शिवसेनेनं खलिस्तानी गटांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान हा सारा गोंधळ घडला. पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चावर दगडफेक करण्यात आली. या संघर्षामध्ये तलावारीही उपसण्यात आल्याने वातावरणामध्ये तणाव निर्माण झालेला.

काही शीख गटांच्या लोकांचा शिवसैनिकांसोबत या मोर्चादरम्यान वाद झाला. दोन्हीकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला. शिवसैनिक ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. पाहता पाहता अचानक दगडफेक सुरु झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.

या मोर्चामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक तलवारी उपसून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. काहीजण पोलिसांशी वाद घालत आहेत तर काही दगडफेक करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिराच्या बाजूच्या इमारतीवर उभी राहून खाली जमलेल्या लोकांवर दगडफेक करताना दिसत आहे.

या सर्व गोंधळावर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस निर्देशकांशी आपली चर्चा झाल्याची माहिती दिली. तसेच या परिसरामध्ये सध्या शांतता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. “पतियालामध्ये घडलेला प्रकार दुर्देवी आहे. मी डीजीपींसोबत बोललो आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात आलीय. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यावर आमचं लक्ष आहे. पंजाबची शांतता सर्वात महत्वाची आहे,” असं मान यांनी म्हटलंय.

या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता बाळगण्याचं आव्हान करत आपआपसातील वाद आणि मतभेद चर्चेने सोडवण्याचं आवाहन केलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stones hurled swords brandished as 2 groups clash during shiv sena rally in patiala scsg

ताज्या बातम्या