नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एकजुटीची ग्वाही देण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘रालोआ’शासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेचा ठराव संमत करून बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे अप्रत्यक्ष रणशिंग फुंकले. त्याच वेळी आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लक्ष्य करण्याची रणनीतीही आखण्यात आली.

केंद्राने जातनिहाय जनगणनेची घोषणा सहा महिन्यांमध्ये बिहारमध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. याचे प्रतिबिंब दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत दिसले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जातगणना करण्यासंदर्भात ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. जातगणनेचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून सुरू असलेले प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ठराव मंजूर केल्याचे स्पष्ट झाले. त्याच वेळी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून काँग्रेस सातत्याने केंद्र व भाजपवर आरोप करत असताना त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी बैठकीतील चर्चेतून समोर आली. सार्वजनिक व्यासपीठांवर ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भातील विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका पंतप्रधानांनी मित्रपक्षांसमोर मांडली. आपापल्या राज्यामध्ये सु-प्रशासनावर अधिक भर दिला जावा, त्याद्वारे विकसित भारताचे ध्येय गाठता येईल, असा सल्लाही मोदींनी दिला.

देशात आणीबाणी लागू झाली, त्या ‘काळ्या दिवसा’ला २५-२६ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न कुणी केला, याची लोकांना पुन्हा माहिती करून देण्यासाठी व्यापक कार्यक्रम आयोजित करण्याचे बैठकीत निश्चित झाले. मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा रालोआ सरकार केंद्रात स्थापन झाले. सरकारला ९ जून रोजी एक वर्ष आणि भाजपच्या सत्तेला ११ वर्षे होत असून या काळातील विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यासंदर्भात देशभर विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.

बेताल विधाने टाळा!

सार्वजनिक ठिकाणी बेताल विधाने न करण्याची सूचना मोदींनी बैठकीत केल्याचे समजते. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी देशाची संरक्षण दले मोदींसमोर झुकतात, असे वक्तव्य केले. भाजपचे राज्यसभेतील खासदार रमचंद्र जांगडा यांनी, पहलगाममध्ये महिलांनी दहशतवाद्यांशी संघर्ष करायला हवा होता, असे म्हटले. मोदींनी या वाचाळवीरांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राकडे पंतप्रधानांचे लक्ष बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राकडे लक्ष असल्याचे सूचित झाले. मोदींचे स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केले. या वेळी मोदींनी दोघांशीही हास्यविनोद केल्याचे दिसले. मध्यंतरामध्ये मोदींनी शिंदे व अजित पवार यांच्यासह एकाच टेबलावर भोजन घेतले. ‘जो हमसे टकराएगा, वह मिट्टी में मिल जाएगा’ हा केवळ वाक्-प्रचार नव्हे, हे वास्तव आहे, हेच मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवून सिद्ध केले, असे शिंदे बैठकीनंतर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दोन दिवस दिल्लीतील निती आयोग व ह्यएनडीएह्णच्या बैठकांमध्ये सक्रिय होते.