गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सातत्याने चर्चेला आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कुत्र्यांमुळे त्रास सहन कराव्या लागलेल्या नागरिकांचा तक्रारीचा सूर असताना दुसरीकडे प्राणीमित्र संघटनकडून या कुत्र्यांकडे भूतदयेच्या दृष्टीने पाहाण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या गुंटूरमधली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

आंध्र प्रदेशच्या गुंटूर परिसरात घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाच ते सहा भटके कुत्रे एका सहा वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करताना दिसत आहेत. हा मुलगा या कुत्र्यांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मागे हे कुत्रे लागल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. शेवटी हा चिमुकला खाली पडल्यानंतर त्याच्यावर हे कुत्रे धावून गेले. शेवटी एक दुचाकीस्वार या चिमुकल्याच्या मदतीला आला आणि त्याची या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली.

मुलगा गंभीर जखमी

कुत्र्यांच्या तावडीतून मुलाची सुटका करण्यात जरी दुचाकीस्वाराला यश आलं असलं, तरी या प्रकारात हा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चिमुकल्याचं नाव कार्तिकेय असून तो सुट्ट्यांसाठी गुंटूरला त्याच्या नातेवाईकांच्या घरी आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी कराटे क्लाससाठी जात असताना या कुत्र्यांनी मुलावर हल्ला चढवला. गुंटूरमधल्या संपत नगर परिसरात हा प्रकार घडला. या मुलाचे पालक हैदराबादला राहात असून त्यांना या प्रकाराची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुलाचे पालक मुलावरील उपचारांवर लक्ष ठेवून आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटना चर्चेत आल्या आहेत. सुप्रसिद्ध वाघ बकरी चहा समूहाचे संस्थापक पराग देसाई यांच्यावरही अशाच कुत्र्यांनी हल्ला केल्याची बाब समोर आली होती. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापतही झाली होती. शेवटी रुग्णालयात उपचार घेताना ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं. ऑक्टोबर महिन्यात काँग्रेस खासदार कार्ती चिदम्बरम यांनी भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी नॅशनल टास्क फोर्सची स्थापना करण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध व शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना कराव्या लागतील, अशी भूमिका त्यांनी सोशल मीडियावर मांडली होती.