एका दलित महिलेच्या हातचे खायचे नाही म्हणून कर्नाटकच्या एका खेडय़ातील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येला दोन वर्षांपासून गळती लागली आहे. या महिलेने मुलांसाठी जेवण बनवू नये, या अटीवर उरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत ठेवले आहे.
कर्नाटकच्या कोलार जिल्हय़ातील कग्गनहल्ली येथील शासकीय उच्च प्राथमिक शाळेत राधाम्मा ही ‘आदि कर्नाटक’ या दलित जातीची महिला मुख्य स्वयंपाकी म्हणून काम करते; पण स्वयंपाक न करणे हा तिच्यासमोर नोकरी टिकवण्याचा एकमेव मार्ग आहे. जानेवारी २०१४ मध्ये या शाळेत पहिली ते आठवीमध्ये ११८ विद्यार्थी होते. फेब्रुवारी २०१४ मध्ये राधाम्माची नेमणूक झाल्यापासून १०० विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे. उर्वरित १८ विद्यार्थ्यांच्या पालकांनी घातलेल्या अटीनुसार राधाम्मा आता विद्यार्थ्यांसाठी दुपारचे जेवण बनवत नाही. तिला दरमहा १७०० रुपये पगार असून सात सदस्यांच्या तिच्या कुटुंबासाठी यातील पै न् पै मोलाची आहे.
कग्गनहल्ली हे १०१ कुटुंबे व ४५२ लोकसंख्या असलेले लहानसे खेडे आहे. खेडय़ातील ४० टक्के लोक अनुसूचित जमातीचे, तर १८.१४ टक्के लोक राधाम्मासारखे दलित आहेत. उर्वरित लोक कुरुबा या इतर मागासवर्गीयांमधील आणि जमीनदार असलेल्या वोक्कलिग समाजाचे आहेत.
आम्ही या खेडय़ातील माध्यान्ह भोजन (मिड-डे मील) योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुलबागल खंड शिक्षणाधिकारी एन. देवराज यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व या भागातील इतर लोकांनी प्रयत्न करूनही गावकरी त्यांच्या मुलांना या शाळेत पाठवण्यास नकार देतात. त्यांचे वागणे आम्ही समजू शकत नाही, असे ते म्हणाले.
शाळेचे मुख्याध्यापक वाय.व्ही. वेंकटचलपती यांनी या परिस्थितीसाठी ‘खेडय़ातील राजकारणाला’ दोष दिला. शाळेची संख्या जून २०१४ मध्ये ११८ वरून ५८ वर आली आणि जून २०१५ पर्यंत ती १८ वर घसरली. पालक शाळेत येऊन टी.सी.ची मागणी करतात. तुम्ही मुलांना शाळेतून काढू नका असे पटवून देण्याचा मी प्रयत्न केला, तर ते मलाच शिवीगाळ करतात, असे त्यांनी सांगितले. ही शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक जण वड्डहल्ली व नांगली यांसारख्या शेजारच्या खेडय़ांमधील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतात. कर्नाटक सरकारच्या नियमानुसार, ज्या शाळेत १० पेक्षा कमी विद्यार्थी असतील, ती शाळा बंद केली जाऊ शकते. कर्नाटक सरकारच्या नियमानुसार माध्यान्ह भोजन योजनेचे जे रजिस्टर बाळगावे लागते, त्यात गेल्या पाच महिन्यांपासून दररोज ‘आज कुणीही जेवले नाही’ हे एकच वाक्य राधाम्मा लिहीत असते!
३४ वर्षांची राधाम्मा गावकऱ्यांच्या बहिष्काराबाबत उदासीन आहे. खेडय़ातील उच्च जातीच्या लोकांच्या दबावामुळे विद्यार्थी सोडून गेले आहेत. मी बनवलेले जेवण्याची कुणाचीच इच्छा नाही. माझ्या जातीच्या विद्यार्थ्यांनाही शाळा सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे, असे ती म्हणाली.