Rajasthan School Collaps: राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील सरकारी शाळेची इमारत शुक्रवारी सकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळा कोसळण्याच्या काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सिलिंग पडत असल्याची माहिती दिली. पण शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण छप्पर आणि भिंत कोसळली.

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी शाळा भरल्यानंतर पहिली ते आठवीचे विद्यार्थी प्रार्थनेसाठी जमले होते. त्यावेळी काही शिक्षक शाळेच्या बाहेरच नाश्ता करण्यात मग्न होते. सिलिंगमधून माती पडू लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन शिक्षकांना याची माहिती दिली. पण शिक्षक उलट विद्यार्थ्यांवरच खेकसले आणि त्यांनी त्यांना परत शाळेत पिटाळून लावले.

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना वाचलेल्या विद्यार्थ्यांनी याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, सिलिंगमधून माती पडू लागली होती. जेव्हा काहीजण बाहेर शिक्षकांना सांगायला गेले. तेव्हा शिक्षक त्यांच्यावरच ओरडले आणि त्यांना निमूटपणे शाळेत जाण्यास सांगितले. तसेच शिक्षक तिथेच नाश्ता करत बसले.

आठवीच्या एका विद्यार्थ्याने सांगितले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परत शाळेत पाठवून दिल्यानंतर काही वेळातच शाळेची भिंत पडली आणि छप्पर मुलांवर कोसळले. भिंत पडू लागताच अनेक मुले इकडे-तिकडे धावायाल लागली. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यानंतर काही वेळातच गावकरी आले आणि त्यांनी मुलांना बाहेर काढले.

गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची भिंत आणि छत जीर्ण झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची डागडुजी करण्यात आली होती.

पाच शिक्षक निलंबित

या दुर्घटनेनंतर पाच शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे सात मुलांचे बळी गेले. तर १५ जण जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. झालावाड येथील पिपलोडी शाळेची इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुःखद असल्याचे ते म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचार सुविधा देण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत.

राजस्थानातील दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ‘‘झालावाड येथे शाळेच्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना दु:खद आहे. शोकाकुल कुटुुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी आणि जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी मी प्रार्थना करते,’’ असे मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. या कठीण काळात माझ्या भावना पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत. अधिकारी पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांकडून टीका

या दुर्घटनेनंतर राजस्थानच्या सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. विरोधक सरकारवर ताशेरे ओढत आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सरकारला धारेवर धरताना सदर दुर्घटना राज्यावरचा काळा डाग असल्याचे म्हटले.