सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) अस्तित्वात येऊन आता महिना होईल मात्र, त्याविरोधात देशभरात सुरु असलेली आंदोलने अद्याप थांबताना दिसत नाहीत. दररोज नव्याने या कायद्याच्या विरोधात आंदोलन होताना दिसत आहे. दरम्यान, गुजरातमधील शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कायद्याविरोधात पंतप्रधान मोदींना धन्यवाद देणारे पत्र लिहिण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुण कापण्याची धमकी देण्यात आली आहे. गुजरातमधील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे.

पालकांच्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील कनकारिया भागातील ‘गर्ल्स लिटल स्टार स्कूल’ या शाळेत हा प्रकार घडला. मंगळवारी वर्गात शिक्षकांकडून फळ्यावर “मी भारताचा नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुधारित नागरिकत्व कायद्यासाठी धन्यवाद देतो. मी आणि माझे कुटुंब या कायद्याचे समर्थन करतो.” असा सीएएसाठी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारा संदेश लिहिण्यात आला. त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, त्यांनी हा संदेश पोस्टकार्डवर लिहून पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर अर्थात साऊथ ब्लॉक सचिवालय भवन, रायसिना हिल्स, नवी दिल्ली या पत्त्यावर आपल्या घरच्या पत्त्यासह लिहावा. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

एका पालकानं सांगितले की, दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आता आपल्या शालांतर्गत परीक्षांमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्याकडूनही अशाच प्रकारचे पोस्टकार्ड लिहून घेण्यात आले. याला जेव्हा या विद्यार्थ्यांनी विरोध केला तर त्यांना धमकी देण्यात आली की जे पोस्टकार्डवर हा संदेश लिहिणार नाहीत त्यांना इंटर्नल परीक्षांमध्ये गुण दिले जाणार नाहीत. यामध्ये निवासस्थानाचा उल्लेख करण्याचा हेतू काय आहे, तो देखील पालकांच्या अनुमतीशिवाय? असा सवाल त्यांनी केला आहे.

दुसऱ्या एका पालकानं सांगितले की, माझी मुलगी सहावीच्या वर्गात शिकते. मला मंगळवारी कळाले की त्यांच्या शिक्षकांनी दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सीएएबद्दल पंतप्रधान मोदींना धन्यवाद देणारा संदेश पोस्टकार्डवर लिहिण्यास सांगितले आहे. माझ्या मुलीला तर हा विषय काय आहे हे देखील माहिती नाही. मात्र, तिला या राजकारणाचा भाग होण्यास भाग पाडण्यात आले. आम्हाला हे मंजुर नाही.

आणखी वाचा – CAA विरोधात आक्रोश, मोदींनी रद्द केला आसाम दौरा; एका महिन्यात दुसऱ्यांदा ओढवली नामुष्की

दरम्यान, या घटनेनंतर बुधवारी दुपारी अनेक पालक शाळेत जमा झाले आणि त्यांनी संचालकांची भेट घेतली. तसेच त्यांनी मुलांकडून अशा प्रकारे कायद्याचे समर्थन करणारा मजकूर जबरदस्तीने लिहून घेतल्याबद्दल निषेध नोंदवला. त्यानंतर शाळा प्रशासनाने याबाबत पालकांची माफी मागितली. तसेच विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आलेले पोस्टकार्ड त्यांच्याकडे सोपवण्यात आले.