रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यानंतर आता सुब्रमण्यम स्वामी यांनी आपला मोर्चा दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे वळवला आहे. नजीब जंग दिल्लीच्या राज्यपालपदासाठी योग्य व्यक्ती नसल्याची टीका स्वामी यांनी केली आहे. माझ्या मते, नजीब जंग राज्यपालपदासारख्या उच्चपदासाठी योग्य नाहीत. ते अरविंद केजरीवाल यांच्यासारखे आणखी एक ४२० आहेत. दिल्लीत संघाच्या माणसाची गरज आहे, असे स्वामी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची (आप) सत्ता आल्यापासून सरकार आणि राज्यपाल नजीब जंग यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे. नजीब जंग यांच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दिल्लीत हस्तक्षेप करू पाहत आहे, असा आरोप अनेकदा केजरीवाल यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असून याठिकाणी राज्यपाल जंग यांचा शब्द अंतिम असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे आप सरकारला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. गेल्या काही दिवसांत स्वामी यांनी राजन, अर्थमंत्री अरूण जेटली आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. स्वामी यांच्या टीकेला केंद्र सरकारच्या असलेल्या मुकसंमतीमुळे राजन यांनी गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्विकारण्यास नकार दिला होता. येत्या ४ सप्टेंबर रोजी राजन गव्हर्नरपदावरून निवृत्त होत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर रघुराम राजन यांना हटविण्यात यशस्वी ठरल्यानंतर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्याकडे मोर्चा वळविला होता. वस्तू व सेवा विधेयकाबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागे अरविंद सुब्रमण्यन यांचाच हात असून अशी व्यक्तींचा सरकारच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो असा आरोप करत स्वामींनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.