भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्य स्वामी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी सुरू करत असलेल्या वृत्तवाहिनीच्या नावावर आक्षेप घेतला आहे. ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीचे माजी मुख्य संपादक अर्णब गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाची वृत्तवाहिनी सुरू करणार आहेत. मात्र, हे नाव संविधानातील कायद्याचा उल्लंघन करणारे असल्याचे स्वामी यांनी १३ जानेवारीला माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. भारतीय संविधानातील कायद्यातंर्गत विशिष्ट नावे आणि प्रतिकांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यावर बंदी आहे. या नावांचा आणि प्रतिकांचा व्यवसायिक कारणांसाठी गैरवापर टाळण्यासाठी विशेष कायदाही आहे. याच कायद्याचा आधार घेत स्वामी यांनी रिपब्लिक या नावावर आक्षेप घेतला आहे. कायद्यातील परिशिष्ट सहामध्ये असलेल्या तरतुदीनुसार रिपब्लिक या नावाचा वापर निषिद्ध आहे. त्यामुळे रिपब्लिक या नावाच्या वृत्तवाहिनीला परवाना देणे एम्ब्लेम्स अँड नेम्स अॅक्ट १९५० चे थेट उल्लंघन करणारे ठरेल, असे स्वामी यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता सरकार स्वामी यांच्या पत्राला काय उत्तर देणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
काही महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांनी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला होता. दहा वर्षे टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राहिलेले अर्णब गोस्वामी राजीनाम्यानंतर नेमके काय करणार, याची उत्सुकता अनेकांना होती. त्यानंतर अर्णब यांनी नवी वृत्तवाहिनी सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधून ही वाहिनी सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
टाईम्स नाऊवरील ‘द न्यूज अवर’ कार्यक्रमामुळे अर्णब गोस्वामी घरोघरी पोहोचले. या एका कार्यक्रमातून टाईम्स नाऊला ६०% उत्पन्न मिळत होते. प्राईम टाईममधील हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. याशिवाय ‘फ्रँकली स्पिकींग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडूंसह महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायचे. अर्णब गोस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीने टिआरपी रेटिंगमध्येही दमदार कामगिरी केली. त्यामुळेच टाईम्स समूहाने अर्णब गोस्वामींची टाईम्स नाऊ आणि ईटी नाऊ या वाहिन्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.