लंडन : भारतीय वंशाच्या ब्रिटिश राजकारणी सुएला ब्रेव्हरमन यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात पंतप्रधान लिझ ट्रस यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यांच्या जागी ग्रँट शाप्स यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या खासगी ईमेल पत्त्यावरून अधिकृत ईमेल पाठवल्यामुळे ब्रेव्हरमन यांना पायउतार व्हावे लागले. ट्रस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आपल्या राजीनामापत्रात त्यांनी पंतप्रधानांच्या धोरणांवर टीका केली. ‘आपली चूक मान्य करणाऱ्यांवर सरकारने विश्वास ठेवला पाहिजे. आपण चुकाच करत नाही आणि काहीतरी जादू होऊन सगळे ठीक होईल, असे मानणे म्हणजे गंभीर राजकारण नव्हे,’ असा टोला ब्रेव्हरमन यांनी लगावला. अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्यानंतर अवघ्या आठवडाभरात ट्रस यांच्या दुसऱ्या मंत्र्याने त्यांची साथ सोडल्यामुळे सरकारवरील संकट वाढल्याचे मानले जात आहे. त्यांच्या जागी गृहमंत्रीपदी नियुक्ती झालेले शाप्स हे बोरीस जॉन्सन मंत्रिमंडळात दळणवळण मंत्री होते.