Car bomb in Pakistan’s Balochistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये एका शाळेच्या बसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३८ जण जखमी आहेत. असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने हिंदूस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात हा हल्ला झाला, अशी माहिती स्थानिक उपायुक्त यासिर इक्बाल यांनी दिली. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण बलोच फुटीरतावाद्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्याकडूनच सातत्याने स्थानिक आणि लष्करांना लक्ष्य केलं जातं.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि मुलांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून बंडखोरी सुरू आहे, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) सह अनेक फुटीरतावादी गट हल्ले करत आहेत. अमेरिकेने २०१९ मध्ये BLA ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला, बीएलएने “पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या सहयोगींवर” अधिक हल्ले करण्याची शपथ घेतली होती. त्यांचे उद्दिष्ट शांत, समृद्ध आणि स्वतंत्र बलुचिस्तानचा पाया रचणे हा आहे.
काही दिवसांपूर्वीही झाला होता आत्मघातकी हल्ला
अफगाणिस्तानच्या सीमेवरील बलुचिस्तानमधील किल्लाह अब्दुल्ला येथील बाजारपेठेजवळ झालेल्या कार बॉम्ब हल्ल्याच्या काही दिवसांनंतर हा हल्ला झाला आहे. जब्बार मार्केटजवळ झालेल्या स्फोटामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले होते आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. या हल्ल्यातही चार जणांचा मृत्यू झाला होता. फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) किल्ल्याच्या मागील भिंतीला लागूनच हे मार्केट होते. स्फोटानंतर, अज्ञात हल्लेखोर आणि एफसी कर्मचाऱ्यांमध्ये गोळीबाराची एक क्षणाची चकमकही झाली.