भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० विमान राजस्थानमधील बारमेरजवळ कोसळले आहे. उत्तरलाई हवाई तळावर विमान उतरण्याआधी हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. या अपघातात तीनजण जखमी झालेत. हे तिघेही जण एकाच कुटुंबातील आहेत. या तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

‘नेहमीचा सराव सुरू असताना सुखोई विमान बारमेरमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत,’ असे संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट मनीष ओझा यांनी सांगितले. ‘बारमेरमधील शिवकर गावाजवळ लढाऊ विमान कोसळल्याच्या घटनेची नोंद सदार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. यानंतर हा संपूर्ण भाग ताब्यात घेण्यात आला आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सुधीर कुमार यांनी दिली आहे. ‘या दुर्घटनेनंतर पोलीस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत,’ असेही सुधीर कुमार यांनी सांगितले.

हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विमानाने जोधपूरहून उड्डाण केले होते. तांत्रिक कारणांमुळे हे विमान बारमेरमध्ये कोसळले. विमान कोसळल्याने आग लागली आणि त्यामुळे परिसरात असणाऱ्या वस्तीतील काही झोपड्यांनी पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी तिघेजण जखमी झाले आहेत.

भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस अपघातांचा दिवस ठरला आहे. सकाळच्या सुमारास उत्तर प्रदेशात चेतक हेलिकॉप्टरला अपघात झाला. अलाहबादमधील हवाई तळावरुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच चेतक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.