सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्युचे कोडे अद्याप उलगडले नसून त्यांचे पती आणि केंद्रीय मंत्री शशि थरूर यांनी रविवारी उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर  जवाब नोंदवला. सुनंदा या शुक्रवारी येथील लीला हॉटेलमधील एका खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या.याप्रकरणी थरूर यांच्यासह सुनंदा यांचा भाऊ राजेश आणि पत्रकार नलिनी सिंग यांचेही न्यायालयासमोर जवाब नोंदवण्यात आले.
शशि थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्याती कथित संबंधांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर शुक्रवारी ५२ वर्षीय सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस शुक्रवारचे हॉटेलमधील सीसीटीव्हीचे चित्रणही बारकाईने तपासण्यात येत आहे. याशिवाय थरूर यांचा खासगी कर्मचारी वर्गाचीही चौकशी करीत आहेत.
न्यायालयासमोर सुमारे ५० मिनिटे थरूर यांनी आपला जवाब मांडला. यावेळी सुनंदासोबतचे संबंध तसेच शुक्रवारच्या घडामोडींबाबतची सविस्तर माहिती दिली.
सुनंदा यांच्या आत्महत्येपूर्वी शेवटचे बोलणे झालेल्या पत्रकार नलिनी सिंग यांचाही जवाब न्यायालयाने नोंदवून घेतला. मेहेर प्रकरणावरून सुनंदा अतिशय व्यथित होती. मृत्युपूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान सुनंदाने जे काही सांगितले. ते सारे आपल्या जवाबात नोंदवल्याचे नलिनी सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, आपली पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यूप्रकरणी चौकशीत सहकार्य करण्यास आपली तयारी आहे, याबाबत त्वरेने चौकशी करून सत्य उघड करावे, असे थरूर यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रसारमाध्यमात आपलीच यात काहीतरी भूमिका असल्याबाबतच्या ज्या वावडय़ा उठवण्यात आल्या आहेत त्यामुळे धक्का बसला असेही त्यांनी म्हटले आहे.
थरूर-सुनंदा प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न-तरार
सुनंदा पुष्कर व केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे आणण्याची आपली कुठलीच भूमिका नव्हती, केवळ कटाचा भाग म्हणून आपले नाव या प्रकरणात गोवण्यात आले, असा दावा केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याशी कथित संबंध असलेल्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनी केला आहे. ‘जिओ वाहिनी’ला मुलाखत देताना सांगितले की,पाकिस्तानी महिला तिच्या देशात बसून त्यांचा विवाह कसा तोडू शकते?  ती अस्वस्थ झाली, की ट्विटरवर यायची.त्यांचे पती व त्यांचे कार्यालय यांनीही ती औषधे घेत असल्याचे म्हटले होते. तिला पोटाचा क्षय होता, हे आपण म्हणत नाही तर भारतीय प्रसारमाध्यमातील बातम्यांत आले आहे. तिचे पतीशी भांडणे होत असे व त्यामुळे तिच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला.या प्रकरणाशी आपला संबंधच नाही असे तरार यांनी स्पष्ट केले.