आपल्या आकाशगंगेतून प्रतिसेकंद १२०० कि.मी. वेगाने जाणारा तारा खगोलवैज्ञानिकांनी शोधला आहे. हा तारा कुठे चालला आहे हे त्यांनाही माहिती नाही पण त्याचे नाव ‘यूएस ७०८’ असे आहे.
आकाशगंगेत एवढय़ा प्रचंड वेगाने मार्गक्रमण करणारा पदार्थ प्रथमच दिसला असून त्याचा वेग एवढा प्रचंड असण्याचे कारण म्हणजे त्याला गुरुत्वाचे वेसण नाही व त्यामुळेच तो आकाशगंगेबाहेर चालला आहे. यूएस ७०८ हा तारा पहिल्यांदा सौरमालेतील द्वैती ताऱ्याचा एक भाग होता व त्यातील एक श्वेतबटू तारा होता.
श्वेतबटू तारा हा नंतर अण्वौष्णिक नवतारा बनला व त्याचा स्फोट झाला त्यातून यूस ७०८ या ताऱ्याला गती मिळाली व तो अवकाशात सुसाट वेगाने जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय चमूने या ताऱ्याच्या द्वैती स्वरूपावर प्रकाश टाकला असून त्यात अण्वौष्णिक स्फोट होऊ शकतात हे दाखवले आहे. या प्रकारचे नव तारे दीर्घिकांमधील अंतर मोजण्यासाठी वापरले जाऊ शकतात व विश्वाचे बदलते रूप तसेच प्रसार होण्याबाबत माहिती मिळते. हवाई बेटांवरील माउई येथील माउंट हालेकाला पॅन स्टार्स१ दुर्बीणीच्या मदतीने हा तारा शोधण्यात आला. गेली ५९ वर्षे या ताऱ्याची माहिती गोळा करण्यात आली.
त्या ताऱ्याची त्रिमिती गती मोजण्यातही त्यामुळे यश आले व तो आकाशाच्या प्रतलातून किती वेगाने जात आहे हे समजले. बेलफास्ट येथील क्वीन युनिव्हर्सिटीच्या खगोलभौतिकी केंद्राच्या डॉ. रुबिना कोटक यांनी सांगितले की ‘ला’ प्रकारातील अण्वौष्णिक स्फोट होणाऱ्या ताऱ्यांचे गूढ त्यामुळे उलगडणार आहे. श्वेतबटू ताऱ्यांमध्ये स्फोटानंतर  ते  ‘ला ’स्वरूपातील नवताऱ्यात रूपांतरित होतात, पण आजपर्यंत त्याची खातरजमा होत नव्हती पण आता ती झाली आहे. किंबहुना त्याचे पुरावे मिळाले आहेत, असे संशोधक चमूचे प्रमुख व युरोपीयन सदर्न ऑब्झर्वेटरीचे (वेधशाळेचे) स्टीफन गियर यांनी सांगितले.